भावाच्या भेटीसाठी माहेरी आलेल्या बहिणीवर दुर्देवाने त्याचा फासावर लटकलेला मृतदेह पाहण्याची वेळ आल्याची घटना शुक्रवारी मच्छे येथे घडली. विठ्ठल गंगाप्पा मऱ्याण्णावर (वय 33) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नांव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, विठ्ठल हा उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत कामाला होता. त्याला दारूचे व्यसन जडले होते. काल दुसऱ्या कामाच्या शोधार्थ तो बाहेर पडला होता. दुपारी तो पुन्हा घरी आला. त्यानंतर झोपायला जातो असे पत्नीला सांगून तो माडीवर गेला होता. कांही वेळाने त्याची बहीण त्याला भेटण्यासाठी माहेरी आली. घरात प्रवेश करताच तिने वहिनीकडे विठ्ठल कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर ते वर झोपी झोपी गेले आहेत असे वहिनीने सांगितले. तेंव्हा वरच्या मजल्यावर भेटण्यासाठी गेलेल्या बहिणीला भाऊ फासावर लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यामुळे मोठा धक्का बसून तिने एकच आक्रोश केला विठ्ठलच्या आत्महत्येचे वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरताच त्याच्या घरासमोर बघ्यांची गर्दी झाली होती. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.