खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमधील अनेक धंदे आणि व्यवसायांमध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेला ‘खानापूर बंद’ 100 टक्के यशस्वी झाला. बंदसह व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये परप्रांतीयांनी जाळे पसरवून स्थानिक भूमिपुत्रांच्या व्यवसायांवर अतिक्रमण सुरू केले आहे. खानापूर शहरांमध्ये तर परप्रांतीयांनी वेगवेगळ्या धंद्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.
निकृष्ट दर्जाचा माल कमी दरात विकून त्यांनी ग्राहकांची फसवणूक चालवली आहे. परिणामी स्थानिक भूमिपुत्रांना आपले व्यापार -धंदे बंद करण्याची वेळ आली आहे. याच्या निषेधार्थ खानापूर व्यापारी संघटनेने आज खानापूर बंदची हाक दिली होती. या हाकेला अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील अन्य सर्व दुकाने बंद ठेवून 100 टक्के प्रतिसाद देण्यात आला.
खानापूर बंदच्या या हाकेला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा समितीने आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला होता. व्यापार्यांच्या आजच्या आंदोलनात समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. बंदच्या हाकेसह खानापूर व्यापारी संघटनेतर्फे तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
खानापुरातील रस्त्यांवरून जोरदार घोषणाबाजी करत निघालेला हा मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मोर्चामध्ये खानापूरसह तालुक्यातील जवळपास सर्व गावातील व्यापारी व दुकानदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.