महाराष्ट्रात एसटी महामंडळाची बस सेवा सुरू झाल्याने कर्नाटक परिवहन मंडळाने देखील आपल्या बसेस महाराष्ट्रात सोडल्यामुळे कर्नाटक महाराष्ट्र परिवहन सेवा अखेर सुरू झाली आहे. बेळगावमधून दोन आणि हुबळी येथून काही बसेस काल सोमवारी महाराष्ट्रात मार्गस्थ झाल्या.
कर्नाटक -महाराष्ट्र बस सेवा पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू होण्यास आणखी 2 -4 दिवसांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसगाड्या सध्या कोल्हापूर शहरात प्रवेश न करता परस्पर पुढे जात आहेत. बेळगाव विभागातून नाशिक आणि ठाणे या दोन ठिकाणी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हुबळी विभागातून शिर्डी पिंपरी व मुंबई या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या आहेत. या सर्व बसेस पुणे मार्गे धावत आहेत.
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे संप मागे घेतल्यानंतर बेळगावातून पूर्ण क्षमतेने महाराष्ट्र आणि कोल्हापूर येथे बसेस सोडल्या जाणार आहेत. बेळगाव ते परिवहन वाहतूक नियंत्रण अधिकारी के. के. लमाणी यांनी महाराष्ट्रातील बससेवा सुरू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून बेळगावातून महाराष्ट्रासाठी आंतरराज्य सेवा सुरू झाली आहे. सध्या बेळगाव विभागातून दोन बसेस सोडल्या जात आहे. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन पूर्णपणे संपताच एकूण 72 बसेस महाराष्ट्रात सोडल्या जाणार आहेत, असेही लमाणी यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रवाशांना आरटी -पीसीआर किंवा कोरोना प्रतिबंधक दोन्ही प्लस घेतल्याचे प्रमाणपत्र कर्नाटकात प्रवेश करताना सादर करावे लागणार आहे. बहुतेकांनी कोरोनाची दुसरी लस घेतलेली असल्याने परिवहन सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा कर्नाटक परिवहन मंडळाला आहे. केवळ महाराष्ट्र परिवहन कर्मचाऱ्यांचा संपूर्णपणे मिळण्याची प्रतीक्षा कर्नाटक परिवहन मंडळाकडून केली जात आहे.
कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेताच बेळगाव -कोल्हापूर दरम्यान बस सेवा सुरू होणार आहे. या सेवेबरोबरच चांदगड आणि कोवाड बस सुरू केले जाणार आहे. बेळगावातून सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. बेळगाव -नाशिक व्हाया पुणे, अहमदनगर सायंकाळी 5:30 वाजता. हुबळी -शिर्डी व्हाया पुणे, अहमदनगर रात्री 9:15. बेळगाव -ठाणे व्हाया पुणे रात्री 9:30 वाजता. हुबळी -पिंपरी व्हाया पुणे रात्री 11:20 वाजता. हुबळी -पिंपरी व्हाया पुणे रात्री 11:55 वाजता.