Saturday, April 27, 2024

/

चोर्ला रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करण्याची मागणी

 belgaum

गोव्याकडे जाणारा चोर्ला रस्ता अत्यंत खराब झाला असून वाताहत झालेल्या या रस्त्यामुळे बेळगावच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याबरोबरच वाहनचालकांना प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे. तेंव्हा चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले जावे, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स फोरमतर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली आहे.

बेळगाव ट्रेडर्स फोरमच्या शिष्टमंडळाने सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) मुख्य अभियंता संजीव हुलिकाई यांना आज मंगळवारी सकाळी सादर केले. जांबोटी पासून कर्नाटक गोवा सीमेवरील चोर्ला गावापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती होणे गरजेचे आहे. गोवा आणि गोव्याची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बेळगावातून पुरवठा होणाऱ्या किराणामाल, दूध, भाजीपाला, कोंबड्या, अंडी, फुले आदी गोष्टींवर अवलंबून आहे. गेल्या अनेक दशकांपासून बेळगाव हे गोव्यासाठी व्यापारी केंद्र आणि पुरवठा केंद्र आहे.

बेळगावपासून सुमारे 150 कि.मी. अंतरावर असणारे गोवा हे सर्वात मोठे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असले तरी दैनंदिन गरजांसाठी ते शेजारील राज्यांवर अवलंबून आहे. बेळगावसह हुबळी, धारवाड, बेळ्ळारी, विजापूर, निपाणी, कोल्हापूर, कारवार आदी जिल्ह्यातून गोव्याला दररोज जीवनावश्यक साहित्याची वाहतूक होत असते. या खेरीज गोव्यातील उद्योग आणि अर्थव्यवस्था कच्च्या मालाच्या आयातीवर अवलंबून आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्यामुळे अनमोड मार्गे गोवा वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक चोर्ला मार्गे वळत असल्यामुळे या रस्त्याची पार वाताहत झाली आहे. परिणामी गेल्या बऱ्याच महिन्यांपासून मोठे खड्डे आणि खाचखळग्यांनी भरून गेलेल्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास आणि वाहने नादुरुस्त होत असल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन चोर्ला रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती केली जावी, अशा आशयाचा तपशील बेळगाव ट्रेडर्स फोरमने सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.Chorla road pwd

 belgaum

सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व केंद्रीय रस्ते आणि खाजगी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही धाडण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करतेवेळी सतीश तेंडुलकर यांच्यासह शेवंतीलाल शहा, विकास कलघटगी, किरण गावडे, अरुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आपल्या मागणीसंदर्भात बेळगाव लाइव्हशी बोलताना सतीश तेंडुलकर यांनी चोर्ला रस्त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली असल्याचे सांगितले. वाताहत झालेल्या चोर्ला रस्त्यामुळे बेळगावची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. बेळगाव हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. गोव्याची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बेळगाववर अवलंबून आहे. साधारण 250 ते 300 भाजीचे ट्रक बेळगावहून दररोज गोव्याला ये-जा करत असतात. त्याचप्रमाणे इतर साहित्यही बेळगावहून गोव्याला जात असते. तथापि खराब झालेल्या चोर्ला रस्त्यामुळे या वाहतुकीला अलीकडे ब्रेक लागला आहे. त्याचप्रमाणे बेळगावची बाजारपेठ कोल्हापूर, हुबळी, धारवाड यासारख्या इतर शहरांकडे वळत आहे. परिणामी याचा फटका बेळगावच्या व्यापाऱ्यांना बसत आहे. यासाठी युद्धपातळीवर चोर्ला रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आम्ही केली आहे. पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता संजीव हुलिकाई यांनी देखील येत्या 15 दिवसात चोर्ला रस्त्याची दुरुस्ती केली जाईल. त्याप्रमाणे चोर्ला रस्तासंदर्भात 20 कोटी च्या प्रकल्पाचा प्रस्ताव यापूर्वीच सरकारकडे धाडण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे, अशी माहिती तेंडुलकर यांनी दिली.

किरण गावडे यांनी यावेळी बोलताना, 8 वर्षांपूर्वी चोर्ला रस्ता अत्यंत उत्तम बनविण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षभरापासून अवजड वाहनांमुळे या रस्त्याची पूर्ण वाताहत झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे रस्ता त्रासदायक व धोकादायक बनला आहे. खराब रस्त्यामुळे चोर्ला परिसराचा विकास होत होता तो आता पुन्हा खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही यापूर्वी अनेकदा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे चोर्ला रस्त्यासंदर्भात तक्रार केली आहे असे सांगून सार्वजनिक बांधकाम खात्याने देखील आपली भूमिका पार पडताना जिल्हाधिकारी आणि आरटीओ अधिकाऱ्यांना चोर्ला मार्गावरून अवजड वाहनांना परवानगी देऊ नये, अशी विनंती केली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, असे गावडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.