ऑफलाइन क्लासेस सुरू झाले असले तरी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी दहावीची परीक्षा पुढे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे .त्यासंदर्भात कर्नाटक माध्यमिक शिक्षण विभागाने विचारविनिमय सुरू केला असून शिक्षक ,शिक्षण तज्ञ आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या मार्फत सल्लामसलत करून दहावी परीक्षेच्या बाबतीतला निर्णय घेतला जाणार आहे.
दरवर्षी सर्वसामान्यपणे 17 मार्च च्या सुमारास दहावीची परीक्षा घेतली जाते. मागील वर्षी तर पूर्णपणे ऑनलाईन अभ्यास करूनच दहावीची परीक्षा घेण्यात आली होती .दहावीच्या परीक्षेत अभ्यासक्रम कमी करून तसेच पर्यायवाचक परीक्षेचे स्वरूप ठेवून ही परीक्षा झाली .मात्र यंदा ऑफलाइन क्लासेस सुरू झाल्यामुळे लवकरात लवकर दहावीची परीक्षा घेण्यासंदर्भातील तयारी सुरू झाली होती.
मात्र शाळांचा आढावा घेतला असता अध्यापही अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मार्च महिन्यात परीक्षा घ्यायची असल्यास संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तितकासा वेळ नसल्याचे म्हणणे शिक्षकांनी आणि शाळांनी व्यक्त केले असून यावर कोणता तोडगा काढावा हा प्रश्न आता दहावी परीक्षा मंडळावर पडला आहे.
अभ्यासक्रम पूर्ण न होता परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून त्यांच्या गुणांवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. यावर विचार विनिमय करून कोणता निर्णय घ्यावा या संदर्भातील चर्चा सध्या सुरू आहे.
मार्चमध्ये परीक्षा घ्यायची असल्यास आतापर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका तयार करावी.किंवा पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एप्रिल किंवा मे मध्ये परीक्षा घेण्यात यावी, या संदर्भात चर्चा केली जात असून लवकरच या बाबतीतील निर्णय दिला जाणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांवर कोणत्या प्रकारचा ताण निर्माण होऊ नये या दृष्टीने शिक्षण विभाग आणि परीक्षा मंडळ योग्य तो निर्णय घेईल असे सांगण्यात आले आहे.