कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशानांही आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र अथवा कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासून सोडले जाणार आहे. याकरिता कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कर्नाटक राज्याच्या सर्व सीमेवर आजपासून तपासणी नाके सुरू केले जाणार असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
कोल्हापूर येथे कोरोना प्रतिबंधक उपाय योजना अंमलबजावणी आदेशाबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी रेखावार बोलत होते. साधा मास्क रुमाल असला तरी दंडात्मक कारवाई होईल. एन -95 अथवा तीन पदरी कापडी मास्क आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान कोगनोळी टोल नाक्यावर राज्यातून कर्नाटकात प्रवेश देताना आरटी -पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. तो नसल्यास कोणत्याही परिस्थितीत राज्यात कोणालाही प्रवेश दिला जाऊ नये, असा आदेश काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आता कोरोना निगेटिव्ह चांचणी किंवा दोन डोस आवश्यक असणार आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कोरोना प्रतिबंधासाठी लसीचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य असून ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेतला नाही अशा 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी त्वरित पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसरा डोस विहित कालावधीत घ्यावा. ‘मास्क नाही -प्रवेश नाही’ हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आला. आता याच पद्धतीने ‘संपूर्ण लसीकरण नाही -प्रवेश नाही’ हा उपक्रम देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
यासाठी जिल्ह्यातील सर्व खाजगी अस्थापने, दुकानदार, घाऊक व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक, एमआयडीसी, पेट्रोल पंप, रेशन दुकानदार आदींनी त्यांच्या आस्थापनांच्या ठिकाणी ठळक अक्षरात ‘संपूर्ण लसीकरण नाही -प्रवेश नाही’ अशा आशयाचे फलक लावावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
संभाव्य तिसर्या लाटेचा धोका टाळण्यासाठी ज्या व्यक्ती खरेदीसाठी व अन्य करण्यासाठी येतील त्यांच्याकडे लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झालेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करूनच त्यांना सेवा द्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोना अनुरूप वर्तनाचे पालन न करणार्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रसंगी रुपये 500 इतका दंड करण्यात येईल. ज्यांनी आपले अभ्यागत, ग्राहक इत्यादींवर कोरोना अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे.
अशा संस्था किंवा आसथापनं याच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आले तर त्या व्यक्तीवर दंड आज्ञा व्यतिरिक्त अशा संस्था किंवा आस्थापनांना सुद्धा रुपये 10 हजार इतका दंड करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले.