निवडणूका आल्या की सत्तेचे गाजर खाण्यासाठी आमिषाच्या मधाचे बोट मतदारांना दाखवण्यात येते. आता बेळगावात विधान परिषदेची निवडणूक तोंडावर आलेली असताना, सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पैश्याच्या थैल्या ढिल्या केल्या आहेत. मतदारांना गाठून मलाच मत दे..अशी आर्जव करत मतदारांचे उंबरे झिजवत आहेत.
बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागांतील एका ग्राम सदस्यांकडे एका संभावित उमेदवाराने मताची मागणी करत पूर्वापार चालीने गॅसची शेगडी देऊ केली, पण मराठी बाण्याचा समितीचा मावळा असल्या बावळ्या प्रेमाला फसला नाही, त्याने स्वाभिमानी पणाने बाणेदार उत्तर देऊन गॅसची शेगडी परत केली.मताचा बाजार मांडणाऱ्या त्या उमेदवाराला मात्र समितीच्या या बाणेदार शिलेदाराच्या कृतीने अचंबित होण्याची वेळ आली.
यानिमित्ताने समितीच्या कार्यकर्त्यांची एकनिष्ठपणा आणि कडवेपण प्रकर्षाने पुढे आले.बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती लढते ती अश्याच एकनिष्ठ लोकांच्या ताकतीवर..समितीचा कार्यकर्ता साधाभोळा गरीब असेल पण बिकाऊ असत नाही हे दाखवून दिले आहे.
विधान परिषद निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आपला उमेदवार देणार की नाही हे अजून निश्चित केले नाही. मात्र राष्ट्रीय पक्षातील गॅस वरचे उमेदवार मात्र गॅस शेगड्या वाटत आहेत.तालुका समितीच्या एकीच्या पार्श्वभूमीवर त्या समितीच्या शिलेदाराच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.