विधान परिषद निवडणुकीचे आव्हान स्वीकारणाऱ्या माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या विजयासाठी खानापुर तालुक्यात झंझावती प्रचार दौरा केला.
दररोज एका तालुक्यात प्रचार दौरा करणार्या आमदार रमेश जारकीहोळी यांनी काल गुरुवारी खानापूर तालुक्यात प्रचाराचा झंजावात उठविला होता. काल एका दिवसात त्यांनी तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या भेटी घेऊन मतं याचना करताना विरोधकांच्या उरात धडकी भरवली आहे.
खानापूर तालुक्यातील इटकी, बिडी, पारिश्वाड, नंदगड, कक्केरी आदींसह 50 हून अधिक ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांच्या भेटी घेणाऱ्या जारकीहोळी यांनी व्यवस्थित प्रचार यंत्रणा राबवताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
खानापूर तालुक्यातील मतदारांना उद्देशून बोलताना त्यांनी भाजप उमेदवाराला विजयी करणे हा माझा संकल्प आहे असे सांगितले. तसेच यासाठी सर्वांनी महांतेश कवटगीमठ यांना मतदान करून माझा संकल्प सिद्धीस नेण्यास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी बेळगावचे भाजप नेते किरण जाधव त्यांच्यासमवेत होते. खानापूर दौरा आटोपताच पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे आमदार रमेश जारकीहोळी सौंदत्ती तालुक्यातील प्रचारासाठी रवाना झाले.