हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर रिंग रोड बाबत हालचाली सुरू असतानाच आता लवकरच पिरनवाडी नाका ते व्हीटीयुपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. तथापि याला पिरनवाडीवासियांनी कडाडून विरोध केला आहे.
पिरनवाडी नाका ते व्हीटीयुपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच पिरनवाडी ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली असून 110 फुटाचा रस्ता केल्यास व्यापारी व नागरिकांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे हा रस्ता 60 फुटाचा करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. मात्र तरीही रस्ता करण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरण्यासह न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार व्यापारी व नागरिकांनी केला आहे.
कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आठ दिवसापूर्वी पिरनवाडी येथे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून भुमीपूजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे लवकरच रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती परिसरातील व्यापारी व नागरिकांना देण्यात आली होती. पिरनवाडी नाक्यापासून अधिक रुंदीकरण केल्यास व्यापारी व नागरिकांचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे अधिक रुंदीकरण करण्यास विरोध करत या भागातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांची भेट घेतली.
अधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी 140 ऐवजी 70 फुटाचा रस्ता करण्याची मागणी करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांनी 140 ऐवजी 110 फुटाचा रस्त्या करण्याबाबत विचार करण्याची माहिती व्यापाऱ्यांना दिली होती.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी 110 फूट रस्ता केल्यास किती नुकसान होईल? याचा अंदाज घेतला असता दोन्ही बाजूची सर्व दुकाने काढावी लागणार आहेत. तसेच रस्त्याला लागून असलेल्या अनेक घरांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या रुंदीकरणाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच व्यापक बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरविली जाणार आहे.