म्हणतात की नवऱ्याने पळी चाटली तर लग्नात पाऊस पडतो..आज कृष्ण तुळशीचा विवाह साक्षात भगवान श्री कृष्णाने पळीतल्या भाताचा आस्वाद घेतला की काय अशी मजेशीर फिरकी पावसाची जनता घेत आहे.
मंगळवारी दुपारी पासुन दाटून आलेलं आभाळ सायंकाळी सहा वाजल्या पासून हळूहळू कोसळू लागले .त्या नंतर पावसाने सुरावटीचा जोर धरला आणि बेळगाव शहर काही प्रमाणात जलमय झालं.
बेळगावात नोव्हेंबर महिन्यातला मधला काळ तसा पाऊस नाममात्र असतो, पण मंगळवारी किंवा गेल्या आठवडाभरा पासून शहर परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहेत.
शहरी लोकांना तितकासा याचा त्रास जाणवला नसला तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मात्र हा पाऊस नुकसानदायक ठरत आहे.ज्यांच्या भात कापण्या अजून खोळंबल्या आहेत ते शेतकरी हवालदिल झाले आहेत.
भात कापणीनंतर ज्या शेतकऱ्यांनी कडपालच्या पेरण्या पूर्ण केल्यात ते शेतकरी समाधानी वाटत आहेत.मंगळवारी बेळगाव शहरात ढगाळ वातावरण तर निर्माण झाले होते, दुसरीकडे पावसा नंतर थंडीचे वातावरण पसरले आहे.या पावसाने किरकोळ आजार बळावण्याची चिन्हे आहेत.एकूणच यावर्षी हिवाळा सुरू झाला तरी अवकाळी पावसाने हजेरी दिली आहेच.