हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि त्यांची तुलना आतंकवाद्यांची करणारे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच त्यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी बेळगावच्या हिंदू जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.
हिंदू जनजागृती समितीतर्फे उपरोक्त मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्र्यांकडे धाडण्यासाठी आज मंगळवारी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. हिंदू धर्म सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धती असे म्हटले आहे. असे असतांना केवळ हिंदु समाजाची बदनामी करण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या संदर्भात गैरसमज पसरवून ‘हिंदुफोबिया’ निर्माण करण्यासाठी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकामध्ये त्यांनी हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘बोको हराम’ या जिहादी आतंकवादी संघटनांशी केली आहे. ‘गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरूपामुळे ऋषिमुनी आणि संत यांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व बाजूला सारले गेले आहे. हे आक्रमक हिंदुत्व ‘इस्लामिक स्टेट’ आणि ‘बोको हराम’ यांसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरूपासारखेच आहे’, असा उल्लेख पुस्तकाच्या पृष्ठ क्र. 113 वर करण्यात आला आहे. अशा प्रकारे लिखाण करून सलमान खुर्शिद यांनी हिंदूंना अपमानित केले आहे. जे वास्तव नाही, त्याचा आभास निर्माण करून हिंदूंना झोडपण्याचे काम काँग्रेस करत आली आहे.
सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकाच्या संदर्भात आम्ही पुढील सूत्रे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत -1) राजकीय उद्देशांनी एकीकडे हिंदूंची मते मिळवण्यासाठी मंदिरांत जाण्याचे नाटक करायचे आणि दुसरीकडे मुस्लिम वोटबँकेसाठी हिंदुत्वावर आरोप करायचे, हे काँग्रेसी षड्यंत्र आहे. त्याचसाठी आम्ही हिंदुत्वावर आरोप करत आहोत, हिंदु धर्मावर नाही, असा खोटा प्रचार केला जात आहे; मात्र प्रत्यक्षात हिंदु धर्म आणि हिंदुत्व वेगळे नाहीत. 2) याबाबत खुलासा करतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हिंदुत्व म्हणजे मारणे, हत्या करणे असे सांगून अजूनच यात तेल ओतले आहे. यामुळे हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 3) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशीद अल्वी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे काही जण मुनी नाही, तर राक्षस आहेत, असे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. 4) हिंदूंविषयी काँग्रेसला खरोखरच कळवळा असता, तर त्यांनी बांगलादेश-पाकिस्तान-अफगाणिस्तान येथील हिंदूंवर जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांकडून होणार्या अत्याचाराच्या संदर्भात आवाज उठवला असता. त्यांनी काश्मिरी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असते, त्यांनी हिंदु धर्माचे, हिंदूंचे, हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली असती; पण तसे होतांना दिसत नाही. 5) हिंदु आणि हिंदुत्व यांविषयी शब्दच्छल करून हिंदूंमध्ये फूट पाडू पहाणार्या काँग्रेसने आजवर कधीतरी ‘इस्लाम आणि जिहादी आतंकवाद’ यांविषयी चकार शब्द काढल्याचे ऐकिवात नाही. त्या वेळी मात्र आतंकवादाला धर्म नसतो, असे सांगितले जाते. हिंदु आणि हिंदुत्व वेगळे भासवून हिंदूंचे श्रद्धाभंजन आणि बुद्धीभेद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करणार्या सलमान खुर्शिद यांचा हिंदु जनजागृती समिती तीव्र निषेध करते.
सलमान खुर्शिद आणि त्यांच्या पुस्तकाच्या आधारे काँग्रेसचे नेते हिंदु समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच जगभरात पसरलेल्या हिंदू समाजाच्या संदर्भात अपप्रचार करून त्यांना संकटात टाकत आहेत. प्रत्यक्षात कोणताही पुरावा नसतांना हिंदुबहुल देशातच हिंदुत्वाला आतंकवादी ठरवून आणि त्याविषयी अपसमज पसरवून हिंदूंची मानहानी करत आहेत. हे अतिशय अनुचित आहे. आपल्या देशात विचार आणि लेखन स्वातंत्र्य असले तरीही त्याचा लाभ घेऊन एका संपूर्ण 100 कोटी जनसंख्येच्या विशाल समाजाला आतंकवादी ठरवून अपमानीत करणे कायद्यानेही गुन्हा आहे. हे रोखण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करावेत, अशी आमची मागणी आहे.
त्याचप्रमाणे हिंदुद्वेषी लिखाण करणार्या सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर त्वरित बंदी घालण्यात यावी. ‘सॅटनिक व्हर्सेस’ या अन्य धर्मियांच्या संदर्भातील पुस्तकावर भारतात बंदी घातली जाऊ शकते, तर ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावरही बंदी घालण्यात यावी. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या सलमान खुर्शिद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचा तपशील बेळगाव हिंदू जनजागृती समितीच्या निवेदनात नमूद आहे.