स्थानिक प्रशासन, पोलीस खाते आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या असहकाराच्या भूमिकेमुळे वरूण कारखानीस या वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्त्याने थेट राज्याच्या वन खात्याच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधून बेकायदा वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आणल्याची घटना नुकतीच भाग्यनगर येथे घडली. या घटनेमुळे शहरात कायदा धाब्यावर बसवून सर्रास खुलेआम बेकायदेशीर वृक्षतोड केली जाते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, काल शुक्रवारी सकाळी 9:30 च्या सुमारास भाग्यनगर येथे एक वृक्ष तोडण्यात येत असल्याचे वरूण कारखानीस या वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्त्याच्या निदर्शनास आले. त्याने वृक्षतोड करणाऱ्या कामगारांकडे चौकशी केली असता त्यांनी आपण वनखात्याचे कर्मचारी असून हा संपूर्ण वृक्ष तासाभरात सोडणार आहोत. तशी परवानगी आमच्याकडे आहे, असे त्यांनी सांगितले.
परवानगीचा कागद दाखवण्यास सांगताच त्यांनी तो आपल्या अधिकाऱ्याकडे असल्याचे सांगितले. तेव्हा वरूणने त्या अधिकारास फोन लावला. परंतु त्यांनी तो उचलला नाही. त्यामुळे वृक्षतोड थांबविण्यासाठी वरूण याने टिळकवाडी पोलिसांकडे मदत मागितली परंतु ती न मिळाल्याने, त्याचप्रमाणे 112 हा मदत वाहिनीचा क्रमांक व्यस्त आणि नॉट रिचेबल लागल्यामुळे वरूणने महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाला फोन लावला. तेंव्हा त्यांनी वनखातेशी संपर्क साधण्यास सांगितले.
वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्याने वृक्षतोडीची तक्रार गांभीर्याने घेतली नाही. परिणामी वरूण कारखानीस याने पंतप्रधान कार्यालय आणि बेळगाव वनखात्याला ई-मेल करून बेकायदा वृक्षतोडीच्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्याने थेट कर्नाटक वन खात्याचे मुख्य सचिव संजय बिज्जूर यांच्याशी संपर्क साधला. बिज्जूर यांनी वरूणच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन सूत्रे हलविताच बेळगावचे वनखाते खडबडून जागे झाले. त्यानंतर एकमेकांवर दोषारोप करण्यास सुरुवात झाली. अखेर स्थानिक नगरसेवकांनी वरून कारखानीस यांना बोलावून घेतले आणि भाग्यनगर येथील वृक्षतोड थांबविण्यात आली.
या प्रकारावरून एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे भाग्यनगर येथे वृक्ष तोड करणार्यांकडे झाड तोडण्याची परवानगी नव्हती. मात्र जाब विचारणारे कोणीही नसल्यामुळे ते अशाप्रकारे खुलेआम वृक्षांची कत्तल करत होते.
वरूण कारखानीस याने शहरातील बेकायदा वृक्षतोडीच्या विरोधात यापूर्वी अनेकदा आवाज उठविला आहे. काल त्याने यासंदर्भात केलेल्या बेधडक प्रशंसनीय कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेकायदा वृक्ष तोडीचा या प्रकारांबद्दल पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून बेळगाव वनखात्याच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.