स्थानिक नुतन नगरसेवकांनी केलेला पाठपुरावा आणि आमदारांनी गांभीर्याने घेतलेली दखल यामुळे हेमु कलानी चौकातील बंद अवस्थेत असलेला हायमास्ट तब्बल 8 महिन्यानंतर दुरुस्त करून आज प्रज्वलित करण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील हेमु कलानी चौकातील हायमास्ट दिवा गेल्या जवळपास 8 महिन्यापासून नादुरुस्त झाला होता. शहरातील प्रमुख चौकात असलेल्या हेमु कलानी चौकातील बंद पडलेल्या हा हायमास्ट पुन्हा पूर्ववत सुरु व्हावा यासाठी मनोहर सांबरेकर, बाळकृष्ण तोपिनकट्टी, युवराज मलकाचे, सिद्धार्थ भातकांडे, ईश्वर नाईक विजय होनगेकर आदी मंडळी सातत्याने प्रयत्नशील होती.
परंतु महापालिका आणि हेस्कॉमकडून कोणतीच दखल घेतली जात नव्हती. दोघांकडूनही हायमास्ट दुरुस्तीची जबाबदारी एकमेकावर ढकलली जात होती. तथापि नूतन नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी याप्रकरणी पाठपुरावा सुरू केला. याच दरम्यान बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी शहरातील पथदीपांच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली. परिणामी आज शनिवारी हेमु कलानी चौकातील हायमास्ट दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन तो पूर्ववत प्रज्वलित करण्यात आला. यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, याच परिसरातील हेमु कलानी चौकापासून आंबाभवनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बहुतांश पथदीप गेल्या कांही महिन्यापासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रहदारीच्या या प्रमुख मार्गावर रात्रीच्या वेळी अंधाराचे सावट असते. हा रस्ता बेळगाव रेल्वे स्थानकानजीक येत असल्यामुळे रात्री-अपरात्री या रस्त्यावरून प्रवाशांची ये-जा असते.
त्यामुळे पथदीपांअभावी निर्माण झालेल्या अंधारामुळे याठिकाणी गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी याकडेही लक्ष देऊन या रस्त्यावरील सर्व पथदीप रात्रीच्या वेळी सुरू राहतील अशी व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.