काँग्रेसच्या काळात सुरू करण्यात आलेल्या नरेगासह अन्य योजनांमुळे सर्व ग्रामपंचायती सशक्त झाल्या असून ग्रा. पं. सदस्य अर्थात मतदार शहाणे झाले आहेत. आता सर्वांनाच सत्तेत बदल हवा आहे. त्यामुळे निश्चितच आमचे उमेदवार विजय होतील, असा विश्वास कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला.
कर्नाटक विधानपरिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रचारासाठी डी. के. शिवकुमार यांचे आज सोमवारी बेळगावात आगमन झाले. आपल्या प्रचार दौर्यात ते जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांची भेट घेऊन चन्नराज हट्टीहोळी यांना मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. मात्र तत्पूर्वी आज सकाळी बेळगावात दाखल झाल्यानंतर आरटीओ सर्कल येथील काँग्रेस भवन येथे पत्रकारांनी छेडले असता त्यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला. ग्रामपंचायत सदस्य आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. आता ग्रामपंचायतीना चांगले अनुदान मिळत आहे. काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या नरेगा सारख्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला 2 -2 कोटी रुपये मिळत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची परिस्थिती सुधारली असून त्या सशक्त झाल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य मतदान करणार आहेत. राज्यातील जनतेला बदल हवा असून विद्यमान सरकार त्यांना नको झाले आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले.
एका महिला आमदाराबद्दल माजी मंत्री रमेश जारकीहोळी काय बोलले? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, एखाद्या महिला आमदाराबद्दल कसे शब्द वापरावेत हे कळाले पाहिजे. महिला आमदाराबद्दल वापरलेल्या शब्दावरून भाजपची संस्कृती दिसून येते. भाजप हा संस्कृती संस्काराचा पक्ष आहे म्हणून मिरवले जात असले तरी एखाद्या महिलेबद्दल गैर बोलले जात असले तर संबंधिताला भाजप नेत्यांनी समज दिली पाहिजे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, शोभा करंदलाजे यांनी याबाबत उत्तर द्यावयास हवे असे डी. के. शिवकुमार म्हणाले.
गोकाक, अरभावी, रायबाग आणि इतर ठिकाणी मतदान शीट काढून घेऊन एखाद्याचे मत दुसऱ्यांने घालावे ही पद्धत चालत आली आहे. याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली जाईल. त्याचप्रमाणे या निवडणुकीसाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था केली जावी. मतदानाचे व्हिडिओ चित्रीकरण केले जावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेसतर्फे केली जाणार आहे. यासाठी आमच्या कांही काँग्रेस नेत्यांनी स्वतः बूथ एजंट म्हणून थांबणार असल्याचे जाहीर केले आहे आम्ही देखील थांबणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.
बेंगलोर अर्बन असू दे किंवा बेळगाव जिल्ह्यातील मतदान असू दे याठिकाणच्या व्हिडिओ चित्रीकरणाची मागणी आम्ही करणार आहोत. मतदानाच्या ठिकाणी बुथमध्ये जाऊन दुसऱ्याने मत घालण्यापेक्षा जो खरा मतदार आहे त्याने स्वतः जाऊन मतदान करावे असा आमचा प्रयत्न आहे, असेही केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.