बेळगाव शहरात बुधवारी दिवाळी खरेदीची धामधूम सुरू असताना अर्धे शहर आणि उपनगरी भाग अंधकारमय झाल्याचा अनुभव बेळगावकरांना मिळाला.
बाजारपेठेत पाऊल ठेवण्यास जागा नाही अशा वातावरणात शहापूर पासून बेळगावच्या अर्ध्या मध्यवर्ती बाजारपेठेपर्यंत चे दिवे गायब झाले होते .त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
हिंदूंचा महत्त्वाचा सण म्हणून दिवाळी ओळखली जाते. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. कोरोना आणि इतर कारणामुळे बंद पडलेल्या बाजारपेठेला या सणामुळे उर्जितावस्था मिळाली आहे. अशा परिस्थितीत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या आणि त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या अशा दोन्ही वर्गाची गैरसोय केल्याचे वातावरण निर्माण झाले.
सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान वीज गायब झाली असून ती परत येणे गरजेचे बनले आहे. दरम्यान यासंदर्भात हेस्कोमने काहीतरी करावे अशी मागणी वाढली आहे.
बेळगाव शहराच्या बरोबरीने शहापुरच्या मार्केटमध्ये सुद्धा अनेक समस्या निर्माण झाल्या असून गैरसोय करणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर वीज परत यावी अशी मागणी जनता व व्यापारी करत आहेत.