Saturday, December 21, 2024

/

काँग्रेसच्या पराभवासाठी भाजपाने कसली कंबर

 belgaum

येत्या 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले असून भाजप व काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नांवे जाहीर केली आहेत. भाजपने पूर्वीच्याच महांतेश कवटगीमठ यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे मतदारांमधील उत्सुकता कमी केली आहे, तर काँग्रेसने विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांना तिकीट दिले आहे. चन्नराज हट्टीहोळी हे प्रथमच राजकीय रिंगणात उतरत असून त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी हे केवळ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू आहेत ही एवढीच त्यांची जमेची बाजू आहे, अन्यथा राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचा फारसा प्रभाव नाही. त्याचाच फायदा भाजप उठवण्याचा प्रयत्नात आहे. भाजपचे विद्यमान आमदार महांतेश कवटगीमठ यांची ही तिसरी टर्म आहे. त्यांची कामाची पद्धत व मतदारात असलेली लोकप्रियता कायम असून यावेळी देखील तेच बाजी मारतील असे चित्र आहे.

तिसरे उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी रिंगणात असणार आहेत लखन जारकीहोळी यांना त्यांचे बंधू भालचंद्र जारकीहोळी यांनी भाजपचा दुसरा उमेदवार करा अशी मागणी केली होती मात्र त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता दोन जागांसाठी तीन प्रबळ उमेदवार असे चित्र या निवडणुकीत होऊ शकते.

प्रारंभीच्या काळात कवटगीमठ यांना या वेळेचे तिकीट मिळेल की नाही? याविषयीची चर्चा राजकीय क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर होती. तथापि या जागेवर त्यांच्याइतका पात्र व योग्य उमेदवार भाजपकडे नसल्याने ही उमेदवारी त्यांनाच देणे भाग पडले. महांतेश कवटगीमठ उत्तर कर्नाटकातील प्रतिष्ठित समजल्या गेलेल्या केएलई संस्थेचे संचालक असून माजी खासदार प्रभाकर कोरे यांचे विश्वासू माणले जातात.

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याकडे या निवडणुकीची संपूर्ण सूत्रे हायकमांडने सोपविली असल्याने या निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे. या निवडणुकीचे चित्र ऐनवेळी पालटण्याची ताकद जारकीहोळी बंधूंकडे असल्याने त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.Kavatgimath satish lakhan

काँग्रेसचे दुसरे एक विद्यमान आमदार विवेक पाटील हे आता भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. एकूणच भाजपचे विद्यमान आमदार महांतेश कवटगीमठ यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून होत असले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

प्रारंभीच्या काळात काँग्रेस व भाजप पक्ष्यांमध्ये उमेदवार कोण असावेत? याविषयी फार मोठा संभ्रम होता. आता दुसऱ्या जागेसाठी अद्याप उभय पक्षांनी आपली अधिकृत नांवे जाहीर केलेली नाहीत. या जागेसाठी दोन्ही पक्षात अनेक जण इच्छुक असले तरी रिंगणात उतरण्याची जोखीम घेण्यास कोणी पुढे येत नसल्याचे चित्र दिसत आहे. एक मात्र नक्की आहे की ज्याच्याकडे ‘मनी पॉवर’ आहे तेच या निवडणुकीत यशस्वी होण्याची शक्यता अधिक दिसते. या वेळेची विधान परिषद निवडणूक दरवेळे पेक्षा वेगळी आहे. पक्षांच्या वरिष्ठांना समोर सध्या मोठे आव्हान असून हा नंबर गेम अर्थात संख्या बळाचा खेळ आहे.

शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलना यामुळे भाजप सध्या अडचणीत आहे. अशा स्थितीत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली जन स्वराज्य यात्रा काढून मते मिळवण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. मात्र त्यालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेसने मात्र अशा प्रकारापासून दूर राहणे पसंत केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.