बेळगावच्या सांबरा विमानतळाकडे ये-जा करण्यासाठी बेळगाव शहरातून बस सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वसामान्य विमान प्रवाशानी आपली तक्रार व्यक्त केली होती. त्या संदर्भात वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र कोणत्याच हालचाली नव्हत्या.
आता वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाने बेळगाव ते सांबरा विमानतळ या बससेवेला सुरुवात करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कर्नाटक परिवहन महामंडळाने बेळगावला येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानाची यादी आणि त्यांची ये जा होण्याची वेळ या संदर्भातील माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेतली असून त्यानुसार सीबीटी ते बेळगाव एअरपोर्ट अशी बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बेळगावच्या सांबरा विमानतळावर विमान प्रवासाची सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्व प्रवाशांना खासगी वाहनाने विमानतळाकडे जाणे परवडत नाही.
त्यामुळे आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कर्नाटक परिवहन महामंडळाने लवकरात लवकर सुरू करावी. अशी मागणी करण्यात आली होती. परिवहन मंत्री श्रीरामलू यांना निवेदन देऊन अशी मागणी झाल्यानंतर आता परिवहन महामंडळ कामाला लागले असून लवकरच विमानतळाला बस उपलब्ध होणार असे चित्र निर्माण झाले आहे.