मांसाहाराची दुकाने बंद ठेवण्याची पूर्वसूचना देऊन देखील मंदिराच्या कळसारोहण कार्यक्रम आणि महाप्रसादाप्रसंगी चिकन दुकान खुले करणाऱ्या दुकानदारास संतप्त नागरिकांनी धारेवर धरून दुकान बंद पाडल्याची तसेच पोलिसात तक्रार नोंदविल्याची घटना आज यमुनापूर गावामध्ये घडली.
याबाबतची माहिती अशी की, शहरानजीकच्या यमनापूर गावातील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री ब्रम्हलिंगेश्वर मंदिराचे उद्घाटन आणि कळसारोहन कार्यक्रम आज शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता.
त्याचप्रमाणे महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमांचे पावित्र्य जपले जावे यासाठी गावातील मटन, चिकन वगैरे मांस विक्रीची दुकाने आज दिवसभर बंद ठेवण्याची पूर्वसूचना गावातील संबंधित सर्व दुकानदारांना पंच मंडळी व गावकऱ्यांकडून देण्यात आली होती. तथापि या सूचनेकडे दुर्लक्ष करून गावातील समर्थ चिकन सेंटर हे चिकन विक्रीचे दुकान सकाळी उघडण्यात आले होते.
याबाबतची माहिती मिळताच श्री ब्रह्मलिंगेश्वर मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमात गुंतलेल्या युवा कार्यकर्ते आणि भाविकांनी संतप्त होऊन आपला मोर्चा त्या चिकन सेंटरकडे वळविला. तसेच दुकान उघडणाऱ्या कामगारांसह दुकान मालकास धारेवर धरून समर्थ चिकन सेंटर बंद करण्यास भाग पाडले.
जाणून बुजून मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमांचे पावित्र्य नष्ट करण्यासाठी सदर चिकन दुकान उघडे ठेवण्यात आले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कांही संतप्त नागरिकांनी संबंधित दुकान कायमचे बंद करण्याची मागणीही केली.
मंदिराच्या पवित्र कार्याप्रसंगी घडलेल्या या प्रकारामुळे गावातील भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप करत प्रशासनासह पोलीस खात्याकडे तक्रार करण्यात आली आहे.