बेळगाव जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे 45 लाख 24 हजार 215 डोस देण्यात आले असून याद्वारे 45 लाखांचा टप्पा पूर्ण करताना बेळगाव जिल्ह्याने लसीकरणात राज्यातील आपले दुसरे स्थान कायम ठेवले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात 31 लाख 54 हजार 461 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 13 लाख 69 हजार 754 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. कोरोना लसीच्या पहिला डोसचे उद्दिष्ट 36 लाख 89 हजार 147 इतके असून ते पूर्ण करण्यासाठी अद्याप 5 लाख 40 हजार डोसची गरज आहे. मात्र दुसर्या डोसच्या प्रतिक्षेत 23 लाखाहून अधिक नागरिक आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत दुसरा डोस देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची सूचना देण्यात आली आहे.
कोरोना वॉरियर्स म्हणजेच जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पहिला डोसचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यांच्या दुसऱ्या डोसचे उद्दिष्टही पूर्णत्वाकडे आहे. जिल्ह्यातील 44 हजार 225 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर 43 हजार 787 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. केवळ 500 आरोग्य कर्मचारीच दुसरा डोस पासून वंचित आहेत. फ्रन्टलाइन वर्करच्या लसीकरणात ही जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील 68 हजार 944 फ्रन्टलाइन वर्कर्संना पहिला तर 65 हजार 318 जणांना दुसरा डोस मिळाला आहे.
जिल्ह्यातील 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या लसीकरणाबाबतही अशीच स्थिती आहे. या वयोगटातील 12 लाख 74 हजार जणांना पहिला डोस तर केवळ 7 लाख 42 हजार जणांनाच दुसरा डोस मिळाला आहे. दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील कोरोना लसीकरणाच्या पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत भरून काढण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. या वयोगटातील 17 लाख 67 हजार 927 जणांना पहिला तर केवळ 5 लाख 19 हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.