सर्व कांही योजनेनुसार झाल्यास 2 कोटी रुपये खर्चाचा अंडरग्राउंड हायड्रोलिक डस्टबिन्स (भुयारी कचरा कुंड) प्रकल्प राबवणारे बेळगाव हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.
महापालिका सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात बेळगावातील प्रत्येक प्रभागांमध्ये अंडरग्राउंड हायड्रोलिक डस्टबिन अर्थात भुयारी कचरा कुंड बसविण्यात येणार असून प्रत्येकी 1 टन कचरा जमा करण्याची या कचरा कुंड्यांची क्षमता असणार आहे.
कचराकुंड आवश्यक कालावधीत भरल्यानंतर एका खास हायड्रोलिक क्रेनद्वारे कचऱ्याची उचल केली जाईल. यामुळे स्वच्छता राखली जाण्याबरोबरच शहरातील वातावरणही आरोग्यदायी राहणार आहे.
सदर सेंसर बसविलेले कचरा कुंड 75 टक्के कचऱ्याने भरताच संबंधित प्रभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वयंचलित संदेशाद्वारे त्याची माहिती मिळेल. त्यानंतर ते क्रेनच्या सहाय्याने भुयारी कचरा कुंडातील कचऱ्याची उचल करतील. सफाई कर्मचाऱ्यांनी जर आलेल्या संदेशाची दखल घेतली नाही तर कचराकुंड 90 टक्के भरल्यानंतर कचऱ्याची तात्काळ उचल करण्याचा आणखीन एक संदेश पाठविला जाईल.
जो संबंधित प्रभागाच्या नगरसेवक आणि महापालिका आयुक्तांसाठी असेल. हा संदेश पाठवून देखील कचऱ्याची उचल झाली नाही तर पुन्हा या दोघांना संदेश पाठवून निष्काळजीपणा बद्दल संबंधित कंत्राटदारांवर कारवाईची व्यवस्था केली जाईल.
शहरातील पहिला अंडरग्राउंड हायड्रोलिक कचरा कुंड शहापूर येथे येत्या पंधरा दिवसात बसविला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक प्रभागांमध्ये एक भुयारी कचराकुंडीत बसविला जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक वार्डात आणखी एक कचरा कुंड बसविला जाईल. शहरात जवळपास 120 हून अधिक ‘ब्लॅक स्पॉट’ असून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर पडलेला असतो. अंडरग्राउंड हायड्रोलिक कचरा कुंडातील कचऱ्याची उचल करण्यासाठी एका खास डिझाईन केलेल्या क्रेन वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून या वाहनाची किंमत 50 लाख रुपये इतकी आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक वॉर्डात एक याप्रमाणे 30 कचराकुंड बसविण्यात येतील. त्यानंतर पुढे आवश्यकतेनुसार कचरा कुंड्यांची संख्या तसेच कचरा उचल करणाऱ्या वाहनांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सदर सेंसर असणाऱ्या डस्टबिनची अर्थात कचरा कुंडाची किंमत प्रत्येकी 3 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. शहरात स्वच्छता रहावी आणि आरोग्यदायी वातावरण असावे यासाठी हा प्रकल्प स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात येणार आहे. दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून सदर प्रकल्पाच्या संपूर्ण तपशिलाची बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्प अधिकाऱ्याकडे चौकशी करण्यात आली आहे.