बेळगाव तालुक्यातील रणकुंडये गावातील मंदिर जमीनदोस्त करण्यात आल्या नंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववाद्यांच्या पुढाकाराने अवघ्या 24 तासात पाडलेले मंदिर उभारण्यात आले आहे. त्यामुळे समस्त गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
रणकुंडये (ता. जि. बेळगाव) गावातील लक्ष्मी गल्ली येथील श्री लक्ष्मी मंदिरा शेजारील गावच्या प्रसिद्ध हुड्डाच मंदिरावर काल बुधवारी रात्री इनामदार कुटुंबातील सदस्यांसह अज्ञात चार-पाच अन्य धर्मांधांनी हल्ला करून मंदिर पाडले. परिणामी गावातील एकोपा आणि शांततेला तडा जाऊन तणाव निर्माण झाला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली आहे. काल रात्री उशिरा ग्रामस्थांची बैठक पार पडल्यानंतर बुधवारी सकाळी भाजप ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह अन्य हिंदुत्ववाद्यांच्या पुढाकाराने पुन्हा अवघ्या 24 तासात मंदिराची उभारणी करण्यात आली. सध्या गावात तणावाचे वातावरण असून बंदोबस्तासाठी गावात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे
मंदिर पाडणाऱ्या धर्मांधांना गावकर्यांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान गावातील प्रार्थना स्थळा लगत असणारे संबंधीत मंदिर पाडल्यामुळे गावात जातीय तणाव निर्माण झाला आहे. मंदिर पाडण्यास आलेल्या हल्लेखोरांनी गावातील एका युवकावर चाकूहल्ला केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी चौघा जणांना पकडून चांगला चोप दिला.
या मारहाणीत चौघेही जखमी झाले असून पाशासाब मेहमूदपाशा इनामदार (वय 74), सय्यद मेहमुर पाशासाब इनामदार (वय 32), उमेद इक्बाल अहमद सौदागर (वय 33, तिघेही रा. वीरभद्रनगर, बेळगाव) आणि अंजुम बाबाजान इनामदार (वय 42 रा. आझाद गल्ली, बेळगाव) अशी त्यांची नांवे आहेत.
इनामदार कुटुंबीयांनी मंदिराच्या जागेवर मालकी हक्क सांगितला असून त्यासाठीच हल्ला करून मंदिर पाडवण्याचा प्रकार केला अश्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.