कर्नाटक राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सातत्याने घटणारी कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन तांत्रिक सल्लागार समितीने काल रविवारी कोरोना निर्बंध आणखी शिथिल करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने आणखी कांही क्षेत्रांवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार कर्नाटकातील विमानतळांवर आंतरराष्ट्रीय वाहतूक सुलभ केली जाणार आहे. यासाठी ताप, खोकला, सर्दी, श्वासोच्छ्वास अडचण आदी समस्या वगळता एसपीओ2 दैनंदिन तपासणी थांबविली जाईल.
भारत सरकार अधिसूचित निवडक देशातून आगमन करणाऱ्यांची आरटी-पीसीआर तपासणी होणार नाही. त्याऐवजी विमान प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित प्रवाशाने एअर सुविधा पोर्टलवर आपला आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट अपलोड केला पाहिजे आणि संबंधित विमान कंपनीने प्रवासापूर्वी त्याची शहानिशा केली असली पाहिजे.
स्वयंचलित थर्मल कॅमेराद्वारे प्रवाशांवर देखरेख ठेवली जावी. विलगीकरण शिष्टाचार अनुसार ग्रेट ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयाच्या प्रचलित मार्गदर्शक सूचीचा अवलंब करावा लागेल. याबाबतचे स्पष्टीकरण आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडून दिले जाईल.
राज्यातील इयत्ता 1ली ते 5 वी पर्यंतचे शाळेचे वर्ग सुरू करण्यास येत्या 25 ऑक्टोबर 2021 पासून परवानगी असणार आहे. मात्र त्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याच्या एसओपीसह कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. मुलांच्या शाळेतील प्रत्यक्ष हजेरीसाठी पालकांचे संमतीपत्र अनिवार्य असणार आहे. शाळेतील प्रवेशापूर्वी मुलांची शारीरिक तपासणी केली जाईल. तसेच वर्ग खोल्यांच्या 50 टक्के क्षमतेने वर्ग भरविले जातील. सॅनीटायझर उपलब्ध करून देण्याबरोबरच शाळेतील प्रवेश आणि प्रस्थाना वेळी फेसमास्क व सामाजिक अंतराचा नियम पाळला गेला पाहिजे.
शाळेतील वर्गांचे दररोज 1 टक्का सोडियम हायपोक्लोराइड मिश्रणाद्वारे निर्जंतुकीकरण केले जावे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचीच इयत्ता 1ली ते 5 वी पर्यंतच्या वर्गासाठी नियुक्ती केली जावी. तसेच वयाची 50 वर्षे ओलांडलेल्या शिक्षकांनी अतिरिक्त फेसमास्कचा वापर करावा. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग सुरू करण्याच्या प्रक्रियेची मार्गदर्शक सूची प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्यातील स्विमिंग पूल अर्थात जलतरण तलाव पुढील अटींवर पुनश्च सुरू करण्यास परवानगी असणार आहे. 1) प्रत्येक बॅचच्या 50 टक्के क्षमतेने तसा फलक प्रवेशद्वारावर लावून जलतरणास परवानगी, 2) प्रवेशद्वारावर प्रत्येकाची श्वसन आणि अंगातील ताप यासंबंधीची तपासणी केली जावी, 3) आजाराची लक्षणे नसणाऱ्यांनाच प्रवेश दिला जावा, 4) ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच फक्त प्रवेश दिला जावा, 5) प्रत्येक बॅचची जलतरणाची वेळ समाप्त झाल्यानंतर विश्रामगृह, पदपथ व इतर सामान्य वावर असणाऱ्या जलतरण तलावावरील सर्व ठिकाणांचे 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईड मिश्रणाद्वारे निर्जंतुकीकरण केले जावे. सरकारने या पद्धतीने नवा एसओपी जाहीर केला असला तरी त्यामध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्यांची आरटी-पीसीआर सक्ती रद्द करण्याबाबत कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट अद्यापही कायम असणार आहे.