उत्तर कर्नाटकातील उसाचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय दक्षिण भारत साखर कारखान्यांच्या फोरमने एकमताने घेतला आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखाने हे उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांमध्ये असून जे दर मोसमामध्ये मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन करतात.
बेळगावमध्ये दक्षिण भारत साखर कारखान्यांच्या फोरमची बैठक नुकतीच पार पडली. सदर बैठकीस उत्तर कर्नाटकातील सर्व साखर कारखान्याचे बहुतांश मालक, चेअरमन आणि संचालक उपस्थित होते.
बैठकीत यंदाचा गळीत हंगाम ऑक्टोंबरमध्ये सुरू केल्यास होणारे प्रतिकूल परिणाम आणि नुकसान यावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. अखेर येत्या 1 नोव्हेंबर पासून गळीत हंगामाला सुरू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. ऑक्टोबरमध्ये उत्तर कर्नाटकातील उसाच्या पिकाची पूर्ण वाढ झालेली नसणार असल्यामुळे या महिन्यात गळीत हंगाम सुरू केल्यास ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यांचे पर्यायाने देशाचे मोठे नुकसान होऊ शकते, असे मत बैठकीस उपस्थित कांही तज्ञांनी व्यक्त केले.
उसाची जर पूर्ण वाढ झाली नाही तर त्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. पूर्ण वाढ होण्याआधीच ऊसाची कापणी झाल्यास त्यामधून अवघी आठ टक्के साखर मिळू शकते, असे तज्ञांनी सांगितले.
बैठकीस उत्तर कर्नाटकातील साखर कारखान्यांशी जोडली गेलेली नेते मंडळी उपस्थित होते त्यामध्ये केएलई सोसायटीचे चेअरमन प्रभाकर कोरे, निराणी ग्रुपचे मुरुगेश निराणी, जगदीश गुडगुंटी, आमदार सतीश जारकीहोळी, समीर सोमय्या, विजयेंद्र सिंग, मुकेश, जवाहलाल दोड्डणावर आदींचा समावेश होता. फोरमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विशेष करून उत्तर कर्नाटकातील उसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आदेश काढावा, अशी विनंती यापूर्वीच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील तसा आदेश काढण्याचे आश्वासन दिले आहे.