बेळगावमधील जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये कोविड लस देण्यात आली असून या लसीकरणाच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घेतले आहे. कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांच्यावर देखील कोविड लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. हैद्राबाद येथील भारत बायोटेक या संस्थेने आयसीएमआर यांच्या सहकार्यांनी कोव्हॅक्सीन ही कोरोनावरील पहिली लस विकसित केली आहे. त्याच्या तिसर्या टप्प्याची चाचणी बेळगावातील जीवन रेखा हॉस्पिटलमध्ये घेण्यात आली.
यासंदर्भात माहिती देताना जीवनरेखा रुग्णालयाचे डॉ. अमित भाटे म्हणाले, कोविड पर्व सुरु झाले त्यावेळी ही लस निर्माण करण्यात येत होती. परंतु त्यावेळी रुग्णसंख्या अतिशय असल्याने लसीकरणासाठी वेळ लागत होता.
आयसीएमआरकडून खूप कमी वेळ देण्यात आला होता. यादरम्यान स्वयंसेवकांना एकत्रित करून, त्यांची कोरोना चाचणी, कोवॅक्सीन देऊन त्यानंतर प्रतिजैविके तयार होतात कि नाही, याची चाचणी करून अहवाल आयसीएमआरला पाठवून द्यायचा होता. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना ही लस देता येत नसल्याकारणाने प्रत्येकाची चाचणी घेऊन अहवाल येईपर्यंत वाट पाहणे अनिवार्य होते. ही लस कोरोनापासून बचावासाठी म्हणून तयार करण्यात आली असून या लसीच्या निर्मितीदरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. जीवन रेखा रिसर्च टीमसाठी ही आनंददायी गोष्ट असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी ते पुढे म्हणाले कि, या लसीचा प्रयोग सुरुवातीला पहिल्या टप्प्यात ४ जणांवर करण्यात आला होता. याला आता चार महिन्यांचा अवधी लोटला असून आता पर्यंत कोणवरही याचा दुष्परिणाम झाला नाही.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० जणांना आणि तिसऱ्या टप्प्यात २००० जणांना ही लस देण्यात आली आहे. लस देण्यात आल्यानंतर पुन्हा २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येतो. या दरम्यान सातत्याने लस देण्यात आलेल्यांचे रक्त तपासले जाते. आणि त्यांच्या तब्येतीचा पाठपुरावा घेण्यात येतो.
सरकारने ही लस सुरुवातीच्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर्सना देण्याची सूचना केली आहे. तसेच ५० वर्षांवरील ज्येष्ठांना, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना लवकरात लवकर देण्याची सूचना केली असून त्या अनुषंगाने आपण कार्य करत आहोत. परदेशी लसीबाबत नागरिकांना उत्सुकता आहे, त्याप्रमाणेच स्वदेशी लसीकरणाबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, तसेच स्वदेशी लसीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.