रेशन कार्डावर मिळणारा तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी नेण्यात येत असताना नंदगड पोलिसांनी जप्त केला.
अळणावर-खानापूर रस्त्यावर एका वाहनातून रेशनच्या तांदळाची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची पक्की खबर नंदगड पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सापळा रचून वाहनासह तांदूळ जप्त केला.
केए २५ सी २६२४ क्रमांकाच्या मालवाहू टेम्पो वाहनातून रेशनचा हा तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेण्यात येत होता. याप्रकरणी वाहनमालक शांतीनाथ पाटील याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नंदगड पोलीस अधिक तपास करत आहेत.
रेशनवर मिळणाऱ्या तांदळाची बाहेरच्या बाजारात विक्री करण्यावर सरकारने निर्बंध आणले आहेत, तरी चोरट्या मार्गाने ही विक्री सुरूच आहे. या प्रकरणी लक्ष ठेवून कारवाई करण्यात येत आहे .
रेशन वर येणारा तांदूळ हा वापरात आला पाहिजे. त्याची विक्री करणे गैर आहे. यामुळे असे प्रकार निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल. असा इशारा पोलिस प्रशासन आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिला आहे.
गांजा प्रकरण दडपणे आले अंगलट : इन्स्पेक्टरसह हुबळीत ६ पोलिस निलंबित
जप्त केलेला गांजा गायब करून
प्रकरण दडपून टाकणे हुबळीतील
पोलिसांच्या अंगलट आले आहे.
याप्रकरणी हुबळी एपीएमसी–
नवनगर पोलीस ठाण्याच्या
निरीक्षकासह ६ पोलिसांना हुबळी–धारवाड शहर पोलीस आयुक्तांनी
निलंबित केले आहे.
हुबळीतील एपीएमसी-नवनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वनाथ चौगुले, एएसआय करियप्पगौडा, पोलीस शिपाई विक्रम पाटील, नागराज, शिवराजकुमार मेत्री आणि गोकुळ रोड पोलीस ठाण्यातील महिला शिपाई दिलशाद होन्नप्पनावर अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. एपीएमसी-नवनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री केला जात असल्याची तक्रार एका नागरिकाने केली होती. त्यावरून पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून दीड किलो गांजाही जप्त केला. मात्र नंतर गुन्हा दाखल करून अटक करण्याऐवजी आरोपींकडून पैसे घेऊन त्यांना सोडून दिले. इतकेच नाही तर जप्त केलेला गांजा परस्पर विकून टाकला असा गंभीर आरोप करण्यात आला होता. याची दखल घेत पोलीस आयुक्त लाबुराम यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश डीसीपी के. रामराजन याना दिला होता. त्यानुसार डीसीपीनी दिलेल्या अहवालानुसार पोलीस आयुक्तांनी या ६ जणांवर निलंबनाची कारवाई केली.