नवीन निवृत्तीवेतन अर्थात पेन्शन योजना रद्द करून पुनश्च जुनी पेन्शन प्रणाली लागू करावी या मागणीसाठी आज सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून धरणे आंदोलन छेडले. याखेरीज आज एक दिवसाचा संप पुकारला होता.
गेल्या एक एप्रिल 2006 पासून लागू करण्यात आलेली नवी पेंशन योजनेमुळे आमचे आणि आमच्या कुटुंबियांचे भवितव्य अडचणीत आले असून या नव्या पेन्शन योजनेमुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत बेळगावातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसीय संप पुकारला. तसेच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी, अशी मागणी करत सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयांसमवेत सांकेतिक सत्याग्रह करत धरणे आंदोलन छेडले.
यावेळी बोलताना सरकारी कर्मचारी संघाच्या संघटना सचिव अंजना महादेव मुरगोड यांनी महात्मा गांधीजींच्या अहिंसा आणि शांतीच्या तत्वाला अनुसरून आम्ही हा सत्याग्रह केला असून 2006 पूर्वी ज्या पद्धतीने पेन्शन योजना कार्यरत होती तीच प्रणाली पुन्हा कार्यरत करावी, अशी आमची मागणी आहे असे सांगितले.
सरचिटणीस चंद्रशेखर कोलकार यांनी आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचे 9,147 कोटी रुपये कापून घेतली असून हा पैसा कुठे गेला माहीत नाही असे सांगून मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत एनपीएसकडून पैसे मिळाले नाहीत, असा आरोप केला.
आजच्या आंदोलनात संघटनेचे सचिव जगदीश गौडापाटील, प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी, पदाधिकारी बाबू सोगलन्नावर, तारामती हेबळी आर. व्ही. हैबती, श्रवण रावणगोळ, रमेश गोणी आदींसह बहुसंख्य स्त्री -पुरुष सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी भाग घेतला होता.