धार्मिक परिवर्तन आणि मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या आरोपाखाली मौलाना कलीम सिद्दिकी यांची झालेली अटक बेकायदेशीर असून आम्ही याचा निषेध करत आहोत, असे बेळगाव येथील मुस्लीम कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट केले आहे.
शहरातील संकम हॉटेलमध्ये आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपरोक्त स्पष्टीकरण देण्यात आले. मुस्लिम नेते मौलाना कलीम सिद्दिकी यांना गेल्या 21 सप्टेंबर 2021 रोजी बेकायदेशीररित्या अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात उत्तर प्रदेश एटीएसने तीन पानाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे मौलाना यांच्यावर निराधार आरोप केले आहेत. अवैध प्रकरणासह धर्मांतरणाशी मौलाना यांना बोगस पणे जोडले गेले आहे. या प्रकरणी एनआयएच्या तपासात कोणतेही समर्थनार्थ पुरावे सापडलेले नाहीत.
खरेतर राज्यघटनेतील कलम 25 मध्ये स्पष्टपणे नागरिकांना त्यांच्या धर्माचे पालन आचरण आणि प्रचार करण्याचे मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत असे असताना मौलाना सिद्दिकी यांना अटक का करण्यात आली? असा सवाल करण्यात आला आहे.
मौलाना सिद्दिकी यांना तुरुंगात डांबण्याचे कोणतेही ठोस कायदेशीर पुरावे नाहीत. त्यामुळे मौलाना कलीम सिद्दिकी यांचा दहा दिवसांचा पोलीस कोठडीचा कालावधी समाप्त होताच त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. याप्रसंगी ॲड. वकार शहापुरी, ॲड. अन्वरअली नदाफ, धार्मिक विद्वान् मुफ्ती तुफैल मोमीन आदी उपस्थित होते.