भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान दिलेल्या नागनूर रुद्राक्षी मठाच्या डॉ. शिवबसव स्वामींचे नाव बेळगाव रेल्वे स्थानकाला देण्यात यावे, असा आग्रह गदग – डंबळचे डॉ. तोटद सिद्धराम स्वामी यांनी केला आहे.
बेळगावच्या नागनूर रुद्राक्षी मठात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. तोटद सिद्धराम स्वामी यांनी सदर आग्रह केला आहे.
बेळगाव ही शिवबसव स्वामींची कर्मभूमी आहे. सुमारे ९० वर्षांपूर्वी १९३२ मध्ये ते बेळगाव शहरात आले. बेळगावच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यांनी योगदान दिले आहे. केएलई संस्थेच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालये सुरु करून या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अन्न आणि न निवाऱ्याची सोय केली. ब्रिटिशांविरोधात लढणाऱ्या अनेक लढवय्यांनी मठात आश्रय घेतला होता. त्यांच्या सोयीसाठी शिवबसव स्वामींनी सर्वतोपरी सहकार्य केले होते.
त्यांचे आदर्श, देशभक्ती, राज्याच्या अखंडतेसाठी आणि एकतेसाठी केलेले प्रयत्न हे प्रत्येकाला आठवणीत राहण्यासाठी रेल्वे स्थानकाला नाव देण्यात यावे, असे आवाहन डॉ. तोटद सिद्धराम श्री यांनी पत्रकार परिषदेत केले.
बेळगावच्या नूतनीकृत रेल्वे इमारतीला शिवबसव स्वामींचे नाव देण्यात यावे, असा आग्रह मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केला आहे.
परंतु या निवेदनाची प्रत आता आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सादर करणार आहोत, अशी माहिती सिद्धराम श्री यांनी दिली.
पत्रकार परिषदेला कारंजीमठाचे गुरुसिद्ध स्वामीजी, नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी, कित्तूर कलमठचे राजयोगीन्द्र स्वामी यांच्यासह अनेक स्वामी उपस्थित होते.