बेळगाव शहरासह जिल्ह्यातील वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रक्रिया प्रकल्पासाठी तब्बल 9 कंपन्यांमध्ये चढाओढ लागली असून याबाबतचे प्रस्ताव त्यांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे सादर केले आहेत.
बेळगाव शहरासह जिल्ह्यातील वैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्पासाठी आधी चार कंपन्यांनी प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर आता मुंबई, सांगली व विजापूर येथील आणखी पाच कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रकल्पासाठी ठेकेदार कंपनी निश्चित करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची शिफारस जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हुक्केरी तालुक्यातील कनगला येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंड दिला जाणार आहे. प्रस्ताव मंजूर होणाऱ्या कंपनीला तो भूखंड कर्नाटक औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर केला जाईल.
या प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडे आधीची चार प्रस्ताव दाखल झाले असून आता इच्छुक कंपन्यांची संख्या आणखी वाढली आहे. नव्याने प्रस्ताव आलेल्या कंपन्यांना मोठ्या शहरातील वैद्यकीय कचरा प्रक्रियाचा अनुभव आहे.
शहरातील खासबाग मधील वैद्यकीय कचरा प्रकल्पाला टाळे ठोकून बजावण्यात आलेल्या नोटीसीवर 22 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यानंतर तो प्रकल्प कायमचा बंद करण्यात येईल असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे कनगला येथेच नवा वैद्यकीय कचरा प्रकल्प होणार असून केवळ ठेकेदार कंपनी निश्चित करण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे.