खानापूर येथे रेल्वे रुळाच्या ठिकाणी उघडकीस आलेल्या खून प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका स्थानिक संघटनेच्या तालुका अध्यक्षासह 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या दिवशी मृत युवकाच्या मोबाईलवर सदर तालुका अध्यक्षाचे वारंवार फोन गेल्याचे आढळून आल्याने ही कारवाई झाली आहे.
खानापूरनजीक बेळगाव -खानापूर रेल्वेमार्गावर गेल्या मंगळवारी रात्री अरबाज मुल्ला (वय 24 सध्या रा. अझमनगर, बेळगाव) या युवकाचा रेल्वेखाली सापडून तुकडे झालेला मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. हा खूनाचा प्रकार प्रेमप्रकरणातून घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अरबाजचा मृतदेह लोहमार्गावर टाकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बुधवारी रात्री अरबाजची आई नजीमा यांनी आपल्या मुलाचा खून झाल्याची तक्रार बेळगाव रेल्वे पोलिस स्थानकात दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन बेळगाव रेल्वे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवानंद अरिणार यांनी लागलीच रात्री चौकशीसाठी 8 जणांना ताब्यात घेतले. अरबाज याच्याशी संबंधित आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
पोलीस चौकशी अंती खुनामागचे निश्चित कारण स्पष्ट होणार आहे. अरबाज याचे खानापूर शहरातील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. याबाबत दोघांच्याही कुटुंबीयांना कल्पना होती. मात्र या संबंधाला मुलीकडच्यांचा तीव्र विरोध होता.
अलिकडेच दोन्हीकडच्या मध्यस्थानी अरबाज आणि त्याच्या प्रेयसीला समज दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांचे भेटणे सुरूच होते. या प्रकरणातील संबंधीत मध्यस्थानाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने प्रेमप्रकरणातूनच अरबाजचा खून झाला असण्याची शक्यता बळावली आहे.