बाल कल्याण खात्याच्या वतीने होत असलेल्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या भरतीआडून कानडीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत खानापूर युवा समितीने महिला आणि बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर गुरुवारी मोर्चा नेला. यावेळी खात्याचे तालुका अधिकारी राममूर्ती यांची भेट घेऊन भरती प्रक्रिया थांबविण्याचे आवाहन केले.
अंगणवाडी शिक्षकांची नियुक्ती करत असताना भरतीसाठी दहावी पास असणे जरूरी आहे, पण याबरोबरच त्यांची प्रथम किंवा द्वितीय भाषा कन्नड असणे आवश्यक आहे असा आदेश खात्याकडून काढण्यात आला आहे. परिणामी ज्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले आहे त्यांची प्रथम आणि द्वितीय भाषा कन्नड नसल्याने या भरती प्रक्रियेत मराठी अर्जदार बाद ठरत आहेत.
याअगोदर ही भाषेची सक्ती नव्हती त्यामुळे मराठी मुलांना मराठी शिक्षिका मिळत होत्या.मात्र शासनाच्या या कानडी फतव्याने अन्याय केला आहे. म्हणून यासंदर्भात जाब विचारण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूर बालकल्याण विभागाचे प्रमुख श्री राममूर्ती यांची भेट घेतली.
यावेळी राममूर्ती म्हणाले,या अगोदर जी अंगणवाडी शिक्षीकांच्या नियुक्तीसाठी समिती नेमली जायची ती तालुक्याच्या लोकप्रतिनिधीच्या अध्यक्षतेखाली असायची, पण आता या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असल्याने ल सरकारने ठराव पारीत केला आहे, हा नियम सहशिक्षिकाना लागू नाही पण ज्यावेळी त्यांना बढती मिळेल त्यावेळी हा कन्नड सक्ती नियम लागू आहे.
यामुळे मुलांच्या मातृभाषेवरच त्यांच्या कोवळ्या वयात टाच येणार आहे. अंगणवाडी स्थापन करत असताना मूळ उद्देश हा मुलांना सकस पोषक आहार व गर्भवतीची काळजी व पौष्टिक आहार मिळावा हा होता, पण कर्नाटक सरकारने या मूळ उद्देशालाच बगल देत कन्नड सक्ती चालवली आहे,
यासाठी बालकल्याण अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला, यासंबंधी येत्या काही दिवसात जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेनार असल्याचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सांगितले.
यावेळी सचिव सदानंद पाटील, ज्ञानेश्वर सनदी, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील ,राजू पाटील, अनंत झुंजवाडकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.