रील आणि रिअल लाइफ दोन्हीमध्ये खरा हिरो बनलेला पुनीत राजकुमार आपल्या अखेरच्या प्रवासातही राजकुमार बनला. लाखो चाहते आणि मान्यवरांनी त्याला शेवटचा निरोप दिला .
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या अप्पू वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय, मान्यवर आणि चाहत्यांनी आवडत्या अभिनेत्याचा निरोप घेतला.
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले अभिनेता पुनीत राजकुमार यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत.
कुटुंबाचा अंत्यविधी पार पडला. भाऊ शिवराजकुमार, त्यांची पत्नी अश्विनी, मुले धृती आणि वंदिता यांना अश्रू अनावर झालेले दृश्य विदारक होते. पुनीत राजकुमार याच्या पार्थिवाचे सकाळी चार वाजता कांथिरवा स्टेडियम येथे आगमन झाले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्याच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले आणि त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. पुनीत यांच्या पत्नी आणि मुलींना सीएम बोम्मई यांच्या हस्ते ध्वज सुपूर्द करण्यात आला.
पुनीतला मुलगा नाही. त्याचा भाऊ राघवेंद्र राजकुमार यांचा मुलगा विनय राजकुमार याने अंतिम संस्कार केले. त्यानंतर पुनितच्या मुलींनी वडिलांच्या समाधीची पूजा केली. पुनीत राजकुमार यांचा अंत्यसंस्कार त्याचे वडील डॉ. राजकुमार यांच्या समाधीपासून १२५ फूट अंतरावर आणि पार्वतम्मा राजकुमार यांच्या समाधीपासून ४५ फूट अंतरावर केला गेला.
यावेळी अप्पूचे कुटुंबीय आणि मान्यवर मंडळींनाच परवानगी देण्यात आली होती. सीएम बोम्मई, माजी सीएम सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, मुनीरत्न, रॉकलाईन व्यंकटेश, किच्चा सुदीप, रविचंद्रन आणि इतर उपस्थित होते.
पुनीत राजकुमार यांच्या निधनाने राज्यभर दु:ख झाले आहे, अंत्यसंस्कारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाऊ शिवराज कुमार यांनी अंत्यसंस्काराच्या वेळी केलेल्या सहकार्याबद्दल चाहत्यांचे आणि सरकारचे आभार मानले. अप्पूचा मृत्यू म्हणजे माझा मुलगा गमावल्यासारखा आहे. कृपया आत्महत्या करू नका. कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे. दुख होतंय, पण ते दुःख गिळून जगावं लागेल. आम्ही तेच करत आहोत. कुटुंबासोबत राहण्याची जबाबदारी आमची आहे, असे आवाहन त्यांनी केले.
दुसरा भाऊ राघवेंद्र राजकुमार चाहत्यांशी बोलताना म्हणाले आता कुणालाही समाधी पाहण्याची परवानगी नाही. अजून तीन दिवसांनी आपण पुन्हा जाऊया. मंगळवारी दिवस आहे. ती विधी मुलांनी आणि घरच्यांनी करावी लागते. त्यानंतर इतरांना दर्शनाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
पुनीतराजकुमार यांच्या अंतिम दर्शनाची व मिरवणुकीची व्यवस्था राज्य सरकारने केली होती. बंगळुरूमध्ये सुरक्षेसाठी दहा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 2 दिवसात 10 लाखांहून अधिक चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून चाहते दाखल झाले होते.