सोनार गल्ली कॉर्नर वडगाव येथे असलेल्या फास्टफूड सेंटरमुळे आसपासच्या दुकानदार आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्यामुळे हे फास्ट फूड सेंटर तात्काळ बंद करून अन्यत्र हटवावे, अशी जोरदार मागणी सोनार गल्ली व बाजार गल्ली येथील दुकानदारांसह नागरिकांनी केली आहे.
सदर मागणी संदर्भातील निवेदन आज शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून आयुक्तांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनार गल्ली कॉर्नर वडगाव येथील छोट्या जागेत एक फास्ट फूड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
हे सेंटर सुरू करताना स्वयंपाकाची भट्टी आतल्या बाजूस करण्याऐवजी समोर रस्त्याशेजारी गटारीवर फरशी घालून त्यावर कट्टा बांधून बसविण्यात आली आहे. या भट्टीवर खाद्य पदार्थ बनविले जाताना त्यामध्ये फोडणी दिली जाते अथवा मसाला पावडर, मिरची पावडर, चटणी पावडर टाकली जाते. त्याचा दर्पामुळे (खाटं) आसपासच्या दुकानदारांना ठसका खोकला आदी त्रासाना सामोरे जावे लागत आहे.
याखेरीज वाऱ्याच्या झोताबरोबर चटणी, मसाला व मिरची पावडर समोरील मुख्य रस्त्यावरील हवेमध्ये पसरत असल्यामुळे ये -जा करणाऱ्या पादचाऱ्यांसह दुचाकी वाहन चालकांना त्याचा त्रास होत आहे.
ठसका -खोकला लागण्याबरोबरच बऱ्याच जणांच्या डोळ्यामध्ये तिखट पावडर जाऊन डोळे चुरचुरण्याचे प्रकार घडत असतात. डोळ्यात अचानक तिखट पावडर गेल्यामुळे या ठिकाणी कांही अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित फास्ट फूड सेंटर त्वरित कारवाई करून ते बंद करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी सोनार गल्ली व बाजार गल्ली वडगाव येथील दुकानदार आणि नागरिक उपस्थित होते.