कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी बेळगाव शहर आणि परिसरातील वीज पुरवठावर त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम सध्यातरी होणार नसल्याचे हेस्कॉमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तथापि लवकरच कोळशाचा मुबलक पुरवठा न झाल्यास कांही प्रमाणात भारनियमन होण्याची शक्यता आहे.
कर्नाटक राज्यातील औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहेत रायचूर व बेळ्ळारी येथील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाते. तसेच यरमारस येथील प्रकल्पांमधून देखील कांही प्रमाणात वीज उत्पादन केले जाते.
या औष्णिक प्रकल्पांमुळे राज्याच्या विविध भागात वीज पुरवठा केला जातो. अनेकदा जलविद्युत प्रकल्पमधून कमी प्रमाणात वीज पुरवठा होत असल्यास औष्णिक प्रकल्प फायदेशीर ठरतात. मात्र राज्यासह देशात कोळशाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होत असल्याच्या बातम्या पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारनियमन करावे लागेल अशी चर्चा होऊ लागली आहे.
यासंदर्भात बोलताना हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत विजेचा कमी प्रमाणात पुरवठा केला जाईल अशी कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी भारनियमनाची चिंता करू नये असे मत व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर वीज संकट निर्माण होणार असल्याची माहिती दिली जात असली तरी त्यावर कोणी विश्वास ठेवू नये.
भारनियमन करायचे असल्यास त्याची पूर्वसूचना ग्राहकांना दिली जाते. सध्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमधून कमी वीज उपलब्ध झाली असली तरी शहर परिसरात भारनियमन होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.