बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात एकाच कुटुंबातील सहा तर समोरच्या घरातील एक मुलगी असे एकूण सात जण घर कोसळून जागीच ठार झाल्याची दुःखद घटना काल घडली आहे.
या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे.
हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बडाल अंकलगी गावातील भीमाप्पा खनगावी यांचे घर कोसळले. त्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेची खबर मिळताच मुख्यमंत्र्यांनी थेट भिमाप्पा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तुमच्या दुःखात संपूर्ण राज्य सहभागी असून लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली.
बागेवाडी पोलीस स्थानक आणि अग्निशामक दलाचे जवान सायंकाळी बडाल अंकलगी गावात दाखल झाले होते. ढिगारा उपसून मृतदेह बाहेर काढल्यानंतर एकाच कुटुंबातील सहा जणांवर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तर समोरच्या घरातील त्या मुलीवर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
संबंधित मुलीच्या बाबतीत ही घटना दुर्दैवी ठरली असून आपल्या मैत्रिणीबरोबर अभ्यास करण्यासाठी ती त्या घरात गेली होती. त्या ठिकाणी तिच्यावर हा प्रसंग गुदरला आहे.
पालक मंत्री गोविंद कारजोळ हेसुद्धा आज घटनास्थळी भेट देणार असून पुढील प्रक्रिया सुरू आहेत. दुर्घटना घडताच थेट मुख्यमंत्र्यांनी पीडितांना फोन केल्यामुळे पीडितांना तसेच प्रशासनालाही धीर आला आहे.