स्वामी विवेकानंद बेळगावात भारत देशात सुधारणा घडवण्यासाठी,सनातन धर्माच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी, भारताचा अध्यात्मिक वारसा आणि भारतीय समाजमनाला जागृत करण्यासाठी म्हणून स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण भारत देशात सन्याशी म्हणून भ्रमण केले.भारत भ्रमण करत असताना स्वामी विवेकानंद बेळगावला १६ ऑक्टोबर १८९२ रोजी पोचले.
स्वामीजींचा बेळगावात २७ ऑक्टोबर पर्यंत बेळगावात बारा दिवस मुक्काम होता.या बारा दिवसाच्या कालावधीत बेळगाव नगरी त्यांच्या पदस्पर्शाने पूनित झाली.या कालावधीत त्यांच्या संपर्कात आलेल्या जनतेला देखील त्यांचा आशीर्वाद लाभला.कोल्हापूरच्या महाराजांच्या खासगी सचिवानी स्वामीजींना पत्र देवून बेळगावातील त्या काळातील प्रख्यात वकील श्री सदाशिव बाळकृष्ण भाटे यांना भेटण्यास सांगितले होते.
त्या प्रमाणे बेळगावात आल्यावर स्वामीजी भाटे यांच्या घरी गेले.भाटे यांनी स्वामीजींना आपल्या घरी काही दिवस मुक्काम करण्याची विनंती केली .स्वामीजींनी भाटे यांच्या घरी तीन दिवस वास्तव्य केले.या कालावधीत स्वामीजींनी भाटे यांच्या परिचयातील बेळगावातील नामवंत व्यक्ती आणि अधिकारी यांच्याशी विविध विषयावर संवाद साधून चर्चा केली.भाटे यांचे एक मित्र वन अधिकारी हरिपाद मित्रा हे स्वामीजींना भेटले.स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाने ते खूपच प्रभावित झाले.हरिपाद मित्रा यांनी स्वामीजींना आपल्या किल्ल्यातील सरकारी निवासस्थानात येवून वास्तव्य करण्याची विनंती केली.स्वामीजींनी काही दिवस त्यांच्या निवासस्थानात वास्तव्य करण्याचे कबूल केले आणि पुढील नऊ दिवस त्यांनी मित्रा यांच्या निवासस्थानी वास्तव्य केले.
मित्रा यांच्या निवासस्थानी वास्तव्य केलेल्या कालावधीत देखील स्वामीजींनी अनेक व्यक्तींची भेट घेवून संवाद साधला.हरिपाद मित्रा आणि त्यांची पत्नी इंदुमती मित्रा यांनी विनंती केल्यामुळे स्वामीजींनी त्या दोघांना आपले शिष्य म्हणून स्वीकारले.नंतर स्वामीजींनी त्यांच्याच निवासस्थानात त्यांना मंत्रादिक्षा दिली.हरिपाद मित्रा यांचे वास्तव्य होते ते घर वनखात्याच्या ताब्यात होते.२००० साली कर्नाटक सरकारने ते घर रामकृष्ण मिशन आश्रमाला बेळगावात केंद्र सुरू करण्यासाठी भेट म्हणून दिले.
स्वामी पुरुषोत्तमा नंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाद मित्रा यांच्या घरा लगतच भव्य अशा युनिव्हर्सल टेंपलची उभारणी करण्यात आली.स्वामी विवेकानंद यांनी नऊ दिवस वास्तव्य केलेल्या हरिपाद मित्रा यांच्या घराची डागडुजी करून त्याचे जतन करण्यात आले आहे.आता हे घर म्हणजे ध्यानधारणा केंद्र बनले असून घरातील मुख्य हॉल मध्ये स्वामी विवेकानंदांची मूर्ती बसवण्यात आली आहे.
*स्वामी विवेकानंद मेमोरियल,स्वामी विवेकानंद मार्ग (रिसालदार गल्ली )
श्री सदाशिव भाटे यांच्या घरात स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस वास्तव्य केले होते ते घर देखील पुनर्संचयित करण्यात आले आहे.२०१३ मध्ये पुनर्संचयनाचे काम सुरू करण्यात आले. तज्ज्ञ वास्तू विशारद आणि प्राचीन वास्तूंच्या पुनर्संचयनाचे काम करण्यात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हे काम पार पडले.हे काम पूर्ण झाल्यावर त्या इमारतीत वस्तू संग्रहालय आणि प्रदर्शन स्थापित करण्यात आले आहे.भाटे यांच्या घराचे पुनर्संचयनाचे काम पूर्ण झाल्यावर १ फेब्रुवारी २०१९ रोजी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे सर चिटणीस स्वामी सुविरानंदजी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.भाटे यांचे हे घर आता स्वामी विवेकानंद मेमोरियल म्हणून ओळखले जाते.बेळगावातील रामकृष्ण मिशन आश्रमाचे हे उपकेंद्र आहे.
या मेमोरियल मध्ये स्वामीजींनी तीन दिवस वास्तव्य केलेली खोली आहे.त्या खोलीत स्वामीजींनी वापरलेल्या वस्तू कॉट,मोठा आरसा आणि काठी ठेवण्यात आली आहे.
प्रदर्शन आणि वस्तू संग्रहालयातील पेंटिंग, म्युरल,शिल्पे,छायाचित्रे पाहताना स्वामीजींच्या जीवनाचे दर्शन घडून स्वामीजींचा संदेशही दिला जातो.
रामकृष्ण आणि विवेकानंद वेदांत साहित्य देखील येथील पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आणि स्वामीजींच्या पवित्र स्मृती जपणाऱ्या स्वामी विवेकानंद मेमोरियलला शेकडो विद्यार्थी आणि नागरिक भेट देतात.
दररोज येथे योगासन वर्ग आणि संस्कृत भाषेचा वर्ग जनतेसाठी घेण्यात येतात.याशिवाय अनेक भाषणे ,संवाद आदी कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येथे.शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भेटीचे आयोजन देखील करण्यात येते.
*रामकृष्ण मिशन आश्रमाचे कार्य
बेळगावातील रामकृष्ण मिशन आश्रमा तर्फे सामाजिक सुधारणेसाठी विविध कार्यक्रमांचे गेल्या वीस वर्षांपासून आयोजन केले जात आहे.याचा लाभ समाजातील निरनिराळ्या घटकांना झालेला आहे.गेल्या तेरा वर्षात आठशे व्यक्तींच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.बेळगाव आणि परिसरातील चारशे विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते.द्रव्य यज्ञ योजने अंतर्गत दर महिन्याला पन्नास गरीब कुटुंबांना रेशन देण्यात येते.हिवाळ्यात पाचशे गरीब स्त्री,पुरुषांना ब्लँकेट देण्यात येतात.विवेकानंद कॉम्प्युटर सेंटर मधून नाममात्र शुल्क आकारून कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्यात येते.
बालक संघ,बालिका संघ आणि युवक संघातर्फे व्यक्तिमत्व विकास आणि मूल्य शिक्षणाचे कार्यक्रम शाळेच्या आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात येतात.विवेकानंद साहित्य भांडारतर्फे वेदांत साहित्य आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावरील पुस्तकांची विक्री आणि वितरण गेल्या वीस वर्षात लाखो जणांना करण्यात आले आहे.जनतेसाठी आठवडा आणि पंधरवड्याला व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.गेल्या वीस वर्षांपासून युवा संमेलन,शिक्षक संमेलन आणि भक्त संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.