विधान परिषद निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीनंतर परिषदेची निवडणूक होणार असली तरी आत्तापासूनच या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.
माजी मंत्री, माजी खासदार ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रकाश हुक्केरी यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी अर्ज केल्याचे समजते.
प्रकाश हुक्केरी आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह किरण साधुनावर व विनय नावलगट्टी हे देखील काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक असल्याचे कळते.
विद्यमान विधान परिषद सदस्य सरकारचे मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ हे यावेळी देखील भाजप उमेदवार म्हणून विधानपरिषद निवडणूक रिंगणात असणार आहेत. त्यांनी नुकताच आपल्या मतदारसंघाचा दौरा करून आपण केलेल्या कार्याचा प्रचार केला.
परिषदेच्या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील प्रभावी जारकीहोळी कुटुंब यावेळी एमएलसी निवडणूक लढवण्याची शक्यता असून लखन जारकीहोळी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून समजते.