हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात अधिकाऱ्यांनी केलेल्या अमानूष मारहाणीत 2016 मध्ये कैद्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कर्नाटक राज्य मानवाधिकार आयोगाने कारागृह अधीक्षक व सहाय्यकाला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला असून कैद्याच्या भीषण मारहाणीबद्दल चौकशीसह फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे कारागृह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
बेळगावातील चोरी प्रकरणात ज्योतीनगर गणेशपूर येथील शेखर अर्जुन मंडोळकरसह पाच जणांवर 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला. खडेबाजार पोलिसांनी अटक करून आरोपींची हिंडलगा कारागृहामध्ये रवानगी केली. कारागृहात कच्चा कैदी शेखर प्रसादनगृहातून पळून जाण्याच्या तयारीत होता, या आरोपा खाली तत्कालीन कारागृह अधीक्षक टी. पी. शेष आणि जेलर के. आर मोरबद यांच्या सूचनेवरून जबर मारहाण करण्यात आल्यामुळे रक्तस्त्राव होऊन कैद्याची तब्येत बिघडली व 9 सप्टेंबर 2016 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या दाव्याला वेगळे मिळून मिळाले.
मंडोळकर याला अधिकाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचा जबाब चोरी प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी आकाश याने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालय न्यायाधीशांपुढे दिला. या जबाबाच्या आधारे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे शेखर याची बहिण संगीता कणगुटकर यांनी तक्रार केली राष्ट्रीय आयोगाने राज्य आयोगाकडे हा विषय वर्ग केला. त्यांनी टी. पी. शेष, मेडिकल ऑफिसर व मुख्य जेलर यांना कारणे दाखवा नोटीस बजावून दाव्याला उपस्थितीबाबत सूचना दिल्या. त्यानुसार शेष व वॉर्डन यांनी लेखी म्हणणे मांडले. परंतु मेडिकल ऑफिसर प्रकृती ठीक नसल्याचे सांगत गैरहजर राहिले. शेष यांचा जबाब आणि संगीता कलगुटकर यांनी केलेली तक्रार यात तफावत जाणवल्यामुळे फेर चौकशीचे आदेश बजावण्यात आले. त्यामध्ये कारागृह अधिकाऱ्यांनी कायद्याला केलेली अमानवी मारहाण स्पष्ट झाली.
यावर मानवाधिकाराकडून अंतरिम निकाल देण्यात आला असून सरकारला एक महिन्यात 5 लाख भरण्याचे आदेश बजावले आहेत. सदर रक्कम नंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जावी असे या आदेशात म्हंटले आहे. तसेच या संदर्भात गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांनी चौकशी करून दोषी अधिकार्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात पोलीस कारागृह अधिकारी सहभागी असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा असे म्हंटले आहे.