बाप्पाचे आगमन करण्याच्या वेळी पाऊस आला तर दरवर्षी काहीशी निराशा ही होतेच. यावर्षीही कालपासूनच पावसाने जोर धरला होता. आज सकाळी बापाच्या आगमनाच्या दिवशीच पाऊस जोरदार पडत होता. अशा पार्श्वभूमीवर बाप्पाचे आगमन करायचे कसे? हा प्रश्न भाविकांना सतावत होता.
मात्र पावसाने उघडीप दिली आणि भाविकांना काहीसा दिलासा मिळाला. वाजत गाजत नाचत नाचत आपापल्या घरगुती बाप्पांना घरी आणण्यात बेळगावकर गुंतले होते. गणेशोत्सवात घरगुती गणेश मूर्तींच्या आगमनाचा सोहळा रंगतदार असतो.
मागच्या वर्षी कोरोनाच्या नियमांमुळे घरगुती गणपती ही अतिशय शांतपणे घेऊन जावा लागला. या वर्षीही नियम असले तरी काही प्रमाणात त्यात शैथिल्य केले आहे, त्यामुळे आपल्या घरचा गणपती अतिशय थाटात घेऊन जाण्यात अनेकांनी भर दिला आहे.
बाप्पाला घरी घेऊन जाऊन त्याचे पूजन करून त्यानंतर मनोभावे आरती करुन त्याला नैवेद्य अर्पण करून त्यानंतर भोजन करण्याची परंपरा बेळगावकर पूर्वीपासून जपत आले आहेत. त्यामुळेच गणेशाच्या आगमनाचा सोहळा पावसाच्या उघडीपिने आणखीनच रंगत चालला आहे.