राज्यभरात अद्यापही नाईट कर्फ्यू जारी असल्यामुळे शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी श्री गणेश विसर्जना दिवशी रात्री 9 च्या आत शक्यतो दिवसभरात सायंकाळपर्यंत महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केलेल्या आपापल्या भागातील नजीकच्या तलाव अथवा विहिरीच्या ठिकाणी श्री मूर्तींचे शांततेत विसर्जन करून सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केले आहे.
यंदाच्या श्री गणेशोत्सवावर प्रारंभी अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मंडपाच्या बाबतीत समस्या निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे गणेशोत्सव पाच दिवसाचा साजरा करावा असा फतवा काढण्यात आला होता. तथापि यासंदर्भात मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाकडून गणेशोत्सव संदर्भातील बहुतांश निर्बंध शिथिल करून घेण्यात यश मिळवले. शहरातील ज्या 75 मंडळांना सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना करण्यास मंदिर अथवा समुदाय भवनाची व्यवस्था नव्हती. त्यांना दहा बाय दहाचा मंडप उभारण्यास परवानगी मिळवून देण्यात आली. गणेशोत्सव जो पाच दिवस साजरा केला जाणार होता तो महामंडळाच्या प्रयत्नांमुळे 10 दिवसांचा साजरा करण्यास परवानगी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात बेळगाव शहर हे एकमेव आहे की ज्याला 10 दिवस सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी मिळालेली आहे.
या पद्धतीने प्रशासनाने गणेशोत्सवासंदर्भात आपल्या परीने सर्वतोपरी सहकार्य केले असल्यामुळे आता सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसल्यामुळे राज्यात नाईट कर्फ्यूचा आदेश अद्यापही जारी आहे. यासाठी श्री अनंत चतुर्दशी गणेश विसर्जना दिवशी येत्या रविवारी कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करून शहरातील सार्वजनिक गणपतींचे विसर्जन रात्री 9 पूर्वी आणि शक्यतो दिवसभरात सायंकाळपर्यंत केले जावे, अशी सूचना प्रशासन व पोलिस खात्याने दिली आहे. या सूचनेचे पालन सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी करावे.
विसर्जनासाठी फक्त दहा कार्यकर्त्यांनी श्री मूर्ती सोबत असावे. मिरवणुकीला परवानगी नसल्यामुळे प्रत्येक मंडळाने आपल्या भागातील नजीकच्या महापालिकेने व्यवस्था केलेल्या विसर्जन स्थळाच्या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करावे. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून उत्साहात पण शांततेने गणेश विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न करावा, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, सरचिटणीस गणेश दड्डीकर व जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या बुधवारी सार्वजनिक श्री गणेश विसर्जनासंदर्भात प्रशासनाशी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांबाबत जागृती करण्याच्या कामाला सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काल गुरुवारी नार्वेकर गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापासून सुरुवात केली आहे. बेळगाव शहरात 378 सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे आहेत.
या सर्व मंडळांना भेटी देऊन श्री गणेश विसर्जन संदर्भातील सूचना व माहिती देण्याचे काम महामंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी हाती घेतले आहे. याकामी उपरोक्त चार प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सागर पाटील, दत्ता जाधव, शिवराज पाटील, महादेव पाटील, मदन बामणे, सतीश गौरगोंडा, बाळू जोशी आदी सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.