Monday, December 30, 2024

/

छ. संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर

 belgaum

कर्नाटकातील नववीच्या समाज विज्ञान हातात समाजशास्त्र विषयाच्या कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर समाविष्ट केला गेल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून ही पुस्तके रद्द करून नव्याने महाराजांचा खरा इतिहास सांगणारी पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट केली जावीत, अशी जोरदार मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे मराठी माध्यमाच्या समाजशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकात आक्षेपार्ह मजकूर वगळला आहे.

समाजशास्त्र विषयाच्या कन्नड भाषेतील पाठ्यपुस्तकाचेच मराठीत भाषांतर करण्यात आले असले तरी मराठी माध्यमाच्या अनुवादकाने भाषांतर करताना आक्षेपार्ह मजकूर वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि कन्नड व इंग्रजी माध्यमात तो मजकूर तसाच ठेवण्यात आला आहे. संभाजीराजांकडे दूरदृष्टी आणि विवेक नव्हता. त्यामुळे ते राज्याचे संरक्षण करू शकले नाहीत. शिवाय औरंगजेबाने केलेल्या हल्ल्यात ते मारले गेले, असा मजकूर कन्नड माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे.

इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात देखील संभाजीराजांकडे दूरदृष्टी व हुशारीचा अभाव होता, असा उल्लेख आहे. मराठा साम्राज्याची साताऱ्याची गादी स्थापन केलेले छत्रपती शाहू हे सामर्थ्यवान नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रशासनाची जबाबदारी पेशव्यांकडे दिली, असा उल्लेखही कन्नड व इंग्रजी माध्यमांच्या त्याच पाठात आहे. मराठी माध्यमाच्या पुस्तकात मात्र उपरोक्त मजकूर वगळून अंतर्गत कलहामुळे शत्रुंचे फावले, औरंगजेबाने त्यांना कपटाने मारले असा उल्लेख आहे.

नववीच्या यंदाच्या समाजशास्त्र भाग -2 पुस्तकात मोगल आणि मराठे नावाचा पाठ आहे. त्यात मराठा साम्राज्याची माहिती आहे. समाजशास्त्र विषयाचे हे पाठ्यपुस्तक आधी कन्नड भाषेत तयार करण्यात आल्यानंतर ते मराठी व इंग्रजीत अनुवादीत करण्यात आले. कन्नड माध्यमाच्या पुस्तकातील संबंधित चूक इंग्रजी माध्यमातही तशीच आहे. मराठी माध्यमात वादग्रस्त उल्लेख टाळला आहे. मात्र कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दिली जात असल्याची कर्नाटकातील मराठा समाजाची तक्रार आहे. अखिल कर्नाटक क्षत्रिय मराठी परिषद व सकल मराठा समाज या दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. तसेच शिक्षण खात्याने संभाजी महाराजां बाबतची चुकीची माहिती पाठ्यपुस्तकातून काढावी, अशी मागणी देखील केली आहे.

सीमाभागासह कर्नाटकात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. मध्य कर्नाटकात शहाजी महाराजांना दैवत मानले जाते. शहाजी महाराजांचा मृत्यू कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील होदूगेर येथे झाला. तेथे शहाजी महाराजांचे स्मारक देखील आहे. कर्नाटकच्या शालेय अभ्यासक्रमात मराठ्यांचा इतिहास खूप त्रोटक असून तोही चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाज्वल्य आहे. त्यांनी स्वराज्यासाठी 9 वर्षात 108 लढाया केल्या आणि त्यापैकी एकही ते हरलेले नाही. इतका प्रखर इतिहास असताना त्यांच्याबद्दल कन्नड व इंग्रजी पाठ्यपुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. यासाठी ताबडतोब इयत्ता नववीची समाजशास्त्राची कन्नड व इंग्रजी पाठ्यपुस्तके रद्द करून शासनाने नवीन पुस्तके छापून त्यामध्ये छ. संभाजी महाराजांचा खरा इतिहास छापावा, अशी मागणी केली.

दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पाठ्यपुस्तकात चुकीची माहिती दिल्याबद्दल कोणीही तक्रार केलेली नाही. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती देण्यात आली असेल तर त्याबाबत पाठ्यपुस्तक विभागाला माहिती देऊन अनावश्‍यक माहिती काढण्याची सूचना केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल सर्वांनाच अभिमान आहे, असे स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.