Monday, January 27, 2025

/

आयुक्तांना मराठी आकस : म्हणतात ‘आय डोन्ट केअर!’

 belgaum

अनंत चतुर्दशी दिवशी श्री गणेश विसर्जनाप्रसंगी मराठीतील नामफलकासंदर्भात महापालिका आयुक्तांनी ‘आय डोन्ट केअर’ अशी उद्धट प्रतिक्रिया व्यक्त करत मराठी भाषेची आपल्याला कदर नसल्याचे दाखवून दिल्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गेल्या कित्येक वर्षापासून श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचा फलक मराठी व कन्नड भाषेत असायचा, मात्र यंदा पहिल्यांदाच हा फलक फक्त कन्नड भाषेमध्ये असल्यामुळे संतप्त मराठी भाषिकांनी महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांना घेराव घालून जाब विचारल्यांची घटना काल रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी घेतली. मराठी भाषेत गणेश भक्तांनी घेराव घालून जाब विचारताच भडकलेल्या निप्पाणीकर यांनी नजरचुकीने कन्नडमध्ये फलक लावला गेला असावा असे सांगून स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘आय डोन्ट केअर’ अशा शब्दात उद्धट प्रतिक्रिया व्यक्त केली. या पद्धतीने मराठी भाषेची आपल्याला कदर नाही हे मनपा आयुक्त आणि दाखवून दिल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषा आणि भाषिकांबद्दलचा कर्नाटक सरकारचा द्वेष सर्वश्रुत आहे. मराठीबद्दल पोटशूळ असणाऱ्या कन्नड संघटना तर सातत्याने या ना त्या उचापती करून मराठी भाषिकांना डीवचण्याचा प्रयत्न करत असतात. या मराठी व्देष्ट्या कन्नड संघटनांचे अशोक चंदरगी, श्रीनिवास ताळुकर वगैरे सारखे उपद्व्यापी नेतेदेखील बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा नामशेष करण्याच्या दृष्टीने कायम कटकारस्थाने करत असतात. सरकारने कानमंत्र दिला असल्यामुळे प्रशासकीय आणि पोलीस खात्यांचे कांही अधिकारी देखील या नेत्यांना अप्रत्यक्ष सहकार्य करत असतात. मात्र उघडपणे कोणीही त्याची वाच्यता करत नाही.

 belgaum

तथापि अनंत चतुर्दशीच्या घटनेवरून महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी हे मात्र याला अपवाद ठरल्याचे दिसून येत. मराठी नामफलकाच्या बाबतीत त्यांनी ‘आय डोन्ट केअर’ अशी प्रतिक्रिया देऊन उघडपणे आपला मराठी भाषेबद्दलचा आकस दाखवून दिला आहे. एक जबाबदार वरिष्ठ अधिकारी या नात्याने जनतेच्या प्रश्नाला समर्पक उत्तर देण्याऐवजी मनपा आयुक्तांनी व्यक्त केलेल्या उद्धट प्रतिक्रियेचा मराठी भाषिकांमध्ये तीव्र निषेध केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.