शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटर परिघात बंदी असलेला गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या मच्छे परिसरातील तब्बल 48 दुकानदारांवर जिल्हा तंबाखू नियंत्रण विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे.
तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरातबाजी करणे, विक्री करणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला ‘कॉट्पा’ अंतर्गत बंदी आहे. तथापि याचे उल्लंघन करून मच्छे परिसरातील पान टपरी, किराणा दुकाने, हॉटेल जवळील लहान दुकानातून गुटखा तंबाखू व सिगारेटची विक्री होत असल्याचे समजल्यानंतर तंबाखू नियंत्रण विभागाने पाहणी केली.
या पाहणीमध्ये अनेक दुकाने शाळा वगैरेंसारख्या शैक्षणिक संस्थांनजीक असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेऊन तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायदा 2003 अंतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण विभागाने नुकतीच अचानक कारवाई करून मच्छे परिसरातील 48 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईमुळे परिसरातील दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा दक्षता अधिकारी डॉ. बी. एन. तुक्कार यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लागार समितीच्या डॉ. श्वेता पाटील, सामाजिक कार्यकर्त्या कविता राजन्नावर, एम. एम. नायक, एम. एस शिंदगी आदींनी उपरोक्त कारवाईत भाग घेतला होता. त्यांना वडगाव पोलिसांचे सहकार्य लाभले