बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत आवाजी प्रचाराच्या प्रक्रियेला बंदी आहे, बुधवारी सकाळी सात वाजल्या पासूननच आवाज प्रचार करण्यावर निर्बन्ध आल्याने आता वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करण्याची पद्धत सुरू झाली आहे.
एकंदर मतदारराजा पर्यंत पोचून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून करत आहेत. बुधवारचा दिवस असल्यामुळे घरोघरी जाऊन उमेदवाराचा अजेंडा आणि पत्रके वाटण्याचे काम सुरू होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मतदाराना आवाहन पत्रकांचे वाटप जोरदार करण्यात आले .याच बरोबरीने घरगुती भेटी घेऊन निवडणुकीत जिंकून आल्यानंतर नेमके काय करणार हे सांगण्याचा प्रयत्न अनेक उमेदवारांनी केला. राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचाराचे स्वरूप मात्र वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे. मतदारांची मागणी गुप्तपणे पूर्ण करण्यावर राष्ट्रीय पक्षातील काही उमेदवारांनी भर दिला असून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारी झाल्या आहेत.
काही ठिकाणी नागरिकांनी लसीकरण झाल्याशिवाय मतदानाला येणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी गुप्तपणे लसीकरण मोहीम आयोजित करून अडून बसलेल्या मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी बोअरवेल खणून देण्याचे प्रकार घडत असून काही भागात गुप्तपणे रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात काम सुरू झाले तरच मतदान करणार अशी आग्रही भूमिका काही मतदारांनी घेतल्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी आपल्या शक्तीचा वापर करून त्या प्रकारची कामे सुरू केली असून त्याबद्दल निवडणूक आयोगकडे तक्रारी होत आहेत. मात्र यासंदर्भात कोणती कारवाई झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्रचारांचे स्वरूप बदलत चालले आहे. पूर्वी सभा आणि बैठका घेऊन उमेदवारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न होत होता. मात्र यावेळी कोणत्याही ठिकाणी जाहिर सभा आणि बैठका झाल्या नाहीत .उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटून आवाहन करण्यावरच सुरुवातीपासून भर दिला आहे .
ऑटोरिक्षा च्या माध्यमातून आवाजी प्रचार करण्यात येत होता ,मात्र आज सकाळी सात वाजल्यापासून हा प्रचार बंद झाल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून गुप्तपणे भेटी घेण्याचे काम सुरू झाले आहे. आता मतदार कोणाला कौल देतात हे शुक्रवारी 3 रोजी स्पष्ट होणार आहे.
शुक्रवार दि 3 रोजी महानगरपालिकेची निवडणूक होणार असून त्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून घेणे हे प्रत्येक उमेदवारांचे लक्ष असणार आहे. आपल्याला आवश्यक मतांची उद्दिष्टे गाठण्यासाठी तीतक्या मतदारांची भेट घेऊन त्यांना मतदान केंद्रावर पोहोचवणे हे एकच उद्दिष्ट आता उमेदवारांसमोर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर आहे.