राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई येत्या शनिवार दि. 25 व रविवार दि. 26 सप्टेंबर असे सलग दोन दिवस बेळगाव दौऱ्यावर येणार असून ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये विजय झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी नुकतीच बेंगलोर येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपण लवकरच बेळगाव दौऱ्यावर येत असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार येत्या शनिवार व रविवारी त्यांचा बेळगाव दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्यादरम्यान आपण बेळगावच्या विकासासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बसवराज बोम्मई दुसऱ्यांदा बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.
बेळगावच्या विकासासंदर्भात ते महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके आणि दक्षिणचे आमदार मुख्यमंत्र्यांसमोर कोणत्या विकास योजनांचा प्रस्ताव ठेवतात याकडे शहरवासीयांचे लक्ष असणार आहे.