खानापूर म. ए. युवा समितीने सीमा प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन तो सोडवावा या मागणीसाठी सीमा भागातून 11 लाख पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याची जी मोहीम हाती घेतली आहे त्या मोहिमेला म. ए. समितीच्या रणरागिनी, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील महिला आघाडीच्या अध्यक्षा उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील आणि यांनी संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र -कर्नाटक (बेळगाव) सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खानापूर म. ए. युवा समितीने हाती घेतलेल्या पंतप्रधानांना पत्रे पाठविण्याच्या मोहिमेला म. ए. समितीच्या महिला आघाडीचा जाहीर पाठिंबा असून जास्तीत जास्त पत्रे पंतप्रधानांना पोचतील यादृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे माजी महापौर सरिता पाटील यांनी सदर पत्रांच्या मोहिमेसंदर्भात आम्ही स्वतः शहरातील सर्व महिला मंडळांना भेटून त्यांच्याशी चर्चा करू आणि प्रत्येक महिला मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक मराठी भाषिकांच्या घरातून पंतप्रधानांना सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीबाबत पत्रे जातील यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय सहनशक्ती बाहेर गेला असल्याचे सांगून गेली 56 वर्षे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुटला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
खानापूर म. ए. युवा समितीचा पंतप्रधानांना सीमाप्रश्नी पत्रे पाठवण्याचा उपक्रम आदरणीय असून मी व्यक्तीशः आणि आमच्या भागातील सर्व महिला मंडळे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू. मी आणि माझ्या सर्व महिला भगिनी सीमा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी मागणी पत्राद्वारे पंतप्रधानांकडे करणार आहोत.
आम्ही महाराष्ट्राचे आहोत, आम्हाला महाराष्ट्रात जायचे आहे आणि आमच्या या मागणीची दखल पंतप्रधान पर्यायाने केंद्र सरकारने घ्यावी यासाठी जास्तीत जास्त पत्रे बेळगाव तालुक्यातील मराठीभाषिकांकडून पंतप्रधानांकडे जातील यासाठी माझे प्रयत्न राहतील, असेही सरस्वती पाटील यांनी स्पष्ट केले.