राज्य निवडणूक आयोगाने बेळगाव महापालिकेची निवडणूक जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर परवानाधारकांनी आपली शस्त्रे नजीकच्या पोलीस स्थानकात जमा करावीत, असा आदेश पोलीस आयुक्त व अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी डॉ. के. त्यागराजन यांनी दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार परवानाधारकांनी आपल्या मालकीची बंदूक, पिस्तूल, रिव्हाॅल्वर आदी शस्त्रे जवळच्या पोलीस स्थानकात जमा करावीत आणि शस्त्र जमा केल्याची रीतसर पावती घ्यावी.
निवडणूक प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर एक आठवड्याने पोलीस अधिकाऱ्यांकडून ही शस्त्रे संबंधित परवानाधारकांना परत केली जाणार आहेत.
तथापि कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी, बँकांचे सुरक्षारक्षक आणि विविध शासकीय खात्यात सेवा बजावणाऱ्या संरक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू असणार नाही.