राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी समारंभ पारंपारिक पद्धतीने बेंगलोर येथील कर्नाटक राजभवनाच्या ग्लास हाउसमध्ये नियमानुसार आज दुपारी पार पडला.
शपथविधी समारंभात राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी नूतन मंत्र्यांना कर्तव्याचे पालन करण्याबरोबरच गोपनीयतेची शपथ देवविली. मागील आठवड्यात मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झालेले बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते.
विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षात यावेळी पहिल्यांदाच राज्याच्या मंत्रिमंडळात जारकीहोळी कुटुंबातील एकही सदस्य नाही. जारकीहोळी कुटुंबातील तीन आमदार बंधुंपैकी एक काँग्रेस तर अन्य दोघे भाजपात आहेत.
बसवराज बोम्मई यांच्या मुख्य कॅबिनेटमध्ये निपाणी -बेळगावच्या आमदार शशिकला जोल्ले या एकमेव महिला मंत्री असणार आहेत. मागील येडियुरप्पा मंत्रिमंडळात त्या महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या.
जोल्ले यांच्याप्रमाणे आमदार उमेश कत्ती यांचा नव्या मंत्रिमंडळात अंतर्भाव झाला आहे. यापूर्वी ते येडियुरप्पा मंत्रिमंडळात त्यांना व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते. आमदार शशिकला जोल्ले आणि आमदार उमेश कत्ती हे दोघेही आज मंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहेत.