बेळगाव शहरात नेमक्या किती युजीडी जोडण्या आहेत याची माहिती घेण्यासाठी शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन अंडरग्राउंड ड्रेनेज अर्थात युजीडी जोडणी व शौचालयांचे सर्वेक्षण करण्याची सूचना महसूल, नगररचना व पाटबंधारे बंधारे विभागाला देण्यात आली आहे.
बेळगाव महापालिकेच्या प्रशासन उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर यांनी काल गुरुवारी यासंदर्भात महत्त्वाची बैठक घेऊन युजीडी आणि शौचालय सर्वेक्षणाचा सदुपयोग घरपट्टी वसुलीसाठी करण्याची सूचना दिली आहे. सर्वेक्षणासाठी गेल्यानंतर संबंधित घरमालकांनी घरपट्टी भरली आहे का नाही? याची माहिती घेणे.
घरपट्टी भरली नसल्यास त्याच्याकडून ती वसूल करण्याची सूचना देण्यात आली आहे. घरोघरी जाऊन घरपट्टी वसूल करण्यासाठी महापालिकेकडे ईडीसी मशीन्स आहेत. महसूल निरीक्षक व बिल कलेक्टर यांच्याकडे या मशीन्स देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणावेळी ईडीसी मशीन्स वापरून घरपट्टी वसूल केली जाऊ शकते.
शहरात भुयारी गटारांचे प्रमाण कमी असून यूजीडी जोडण्यांची संख्या देखील कमी आहे. तथापि शहरात नेमक्या किती जोडण्या आहेत याची माहिती महापालिकेला हवी आहे. यूजीडी जोडण्या नसलेल्या घरातील सांडपाणी कुठे सोडले जाते? याची माहिती घेतली जाणार आहे. बेळगाव शहर हागणदारीमुक्त करणे हा यामागचा उद्देश आहे. त्यासाठी शहरातील किती घरांमध्ये वैयक्तिक शौचालये आहेत याची माहिती घेतली जाणार आहे. किती कुटुंबांकडून सार्वजनिक शौचालयाचा वापर होतो? याची देखील माहिती यामुळे मिळणार आहे.
शौचालय नसलेल्यांना निधी मंजूर केला जाणार आहे. शौचालय बांधण्यासाठी जागा असलेल्या कुटुंबांना स्वच्छ भारत योजनेतून शौचालय बांधण्यासाठी निधी दिला जातो. मात्र अनेक कुटुंबाकडून या योजनेचा फायदा घेतला जात नाही. आता अशा कुटुंबांना शोधून निधी देण्याची योजना आहे.