महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ही मान्यता मिळवण्याचा पहिला मान प्रभाग 33 मधून माजी महापौर वंदना मोहन बेळगुंदकर यांनी मिळवला आहे. याच बरोबरीने प्रभाग 31 मधून राजश्री नंदकुमार हावळ यांनी अधिकृत उमेदवारी मिळवली आहे.
वॉर्डातील समिती नेते, कार्यकर्ते आणि पंच मंडळींचा कौल या जोरावर या दोन महिला उमेदवारांनी समितीची अधिकृत उमेदवारी मिळवली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या यादीकडे फक्त मराठी भाषिक नव्हे तर इतर नागरिकांचे आणि राष्ट्रीय पक्षांचे लक्ष आहे. यावेळची निवडणूक राजकीय पक्ष विरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समिती अर्थात मराठी अशी होणार असल्यामुळे आणि खासदारकीच्या निवडणुकीत चांगली वातावरण निर्मिती झाल्यामुळे तसेच यावेळच्या निवडणुकीत वाद आणि फूट निर्माण होण्याला वाव न देता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रत्येक वार्डात एकच उमेदवार राहील या प्रकारचे नियोजन केल्यामुळे चांगलीच गाजणार व लक्षात राहणार आहे.
40 प्लसच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वच पक्षांचे, कर्नाटक राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.
राष्ट्रीय पक्षांचा समावेश असला तरी राजकीय पक्षातील उमेदवारात निवडीच्या राजकारणातून मोठ्या प्रमाणात नाराजी, पक्षीय उमेदवार आणि त्यांचे समर्थक यातील नाराजीचा फायदा यावेळी समितीलाच होणार आहे.